![]()
वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे हळदीच्या कारखान्यात पाणी टाकण्यासाठी विद्युतपंपला पाईप लावतांना विजेचा धक्का बसल्याने बिहार राज्यातील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 अकस्मात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजनगाव शिवारात असलेल्या हळदीवर प्रक्रिया करून पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर बिहार राज्यातील मजूर कामावर आहेत. या ठिकाणी हळद पावडर व इतर साहित्य तयार करून विक्रीसाठी पाठविले जाते. शुक्रवारी ता. 3 दुपारच्या सूुमारास गोविंदा पासवान (45, रा. समस्तीपूर, बिहार) हे काम करीत होते. यावेळी हळदीवर पाणी टाकण्यासाठी त्यांनी विद्युतपंप सुरु केला होता. त्यानंतर विद्युतपंपाला लोखंडी पाईप जोडत असतांना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये ते पाईपला चिटकून काही क्षणातच बाजूला फेकल्या गेले. सदर प्रकार इतर मजूरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोविंदा यांना तातडीने उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या प्रकरणी मुकेश सदा यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, विजय उपरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत गोविंदा यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह त्यांच्या मुळगावी पाठविण्यात आला आहे. मयत गोविंदा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मिरासे पुढील तपास करीत आहेत.
Source link
वसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद