![]()
उबाठा पक्षाची सूत्रे आता उद्धव ठाकरेंऐवजी संजय राऊतांच्या हातात गेल्याचे दिसत असून, राऊत ठाकरेंना पूर्णपणे बुडवतील. मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर त्यांच्यासोबत कोण राहील, आगामी काळात या पक्षात केवळ ठाकरे आणि राऊत हे दोघेच शिल्लक राहतील आणि सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते पक्ष सोडतील, असा दावा भाजपचे माजी आमदार संजय केनेकर यांनी केला आहे. संजय केनेकर म्हणाले की, स्वतःच्या पायावर स्वतःच दगड मारून घेतल्यामुळे आज ठाकरेंवर मोठे राजकीय आणि मानसिक आघात होत आहेत. या आघातांमधून निर्माण झालेल्या उद्विग्नतेमुळे ते काय बोलत आहेत याचे भानही त्यांना राहिलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न भाजप सरकारने कायदेशीर मार्गाने निकाली लावला; मात्र उद्धव ठाकरे प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर करून लोकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. कोट्यावधी रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांबद्दल अशी विधाने करणे म्हणजे समस्त रामभक्तांचा घोर अपमान आहे. राऊतांमुळेच ठाकरेंवर ही वेळ संजय केनेकर म्हणाले की, राऊतांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आणि धोरणांमुळेच आज शिवसेनेवर ही वाईट वेळ आली आहे, तरीही उद्धव ठाकरे त्यांच्याच शब्दावर चालत आहेत हे या पक्षाचे मोठे दुर्दैव आहे. राऊत आणि ठाकरे यांच्या रोजच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील, याचा विचार करून बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा कट्टर शिवसैनिक आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उबाठा संपण्याचा मार्गावर संजय केनेकर म्हणाले की, उबाठा गटाकडून सरकारवर कितीही खोटे आरोप केले तरी महाराष्ट्रातील जनता अजिबात संभ्रमात पडणार नाही. राज्यातील विकासाचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सुरू असून, जनता सर्व काही जाणून आहे. याच विकासकामांच्या जोरावर भाजपची ताकद सातत्याने वाढत असून उबाठा गट मात्र संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, असा टोला त्यांनी लगावला.
Source link
'उबाठा'त फक्त उद्धव ठाकरे-संजय राऊतच उरणार:मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर सोबत कोण राहणार, संजय केनेकरांचा ठाकरेंना रोकडा सवाल