![]()
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत करत, “एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला. तर राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणात “चोरी करणाऱ्यांना योगी आदित्यनाथ सरकार कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी चंद्रपूरमधील भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मात्र बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार देत, “त्या विषयावर मी प्रतिज्ञा केली आहे, आता एक शब्दही बोलणार नाही,” अशी भूमिका घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीपासून राम मंदिर, वैधानिक विकास मंडळ, चंद्रपूर भाजपमधील घडामोडी आणि विदर्भाच्या विकासापर्यंत विविध विषयांवर भूमिका मांडली. कर्जमाफीवर समाधान; ‘एकही शेतकरी सुटणार नाही’ राज्य सरकारने जाहीर केलेल्या 56 लाख शेतकऱ्यांसाठीच्या सुमारे ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले की, हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. काही तांत्रिक अडचणी किंवा नियमांमुळे कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, याची काळजी सरकार घेणार आहे. कृषिमंत्री मामा भरणे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे, नियमांच्या कारणामुळे कोणताही शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राम मंदिरातील चोरी दुर्दैवी; ‘चोराला कायद्याने शिक्षा होईल’ राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणावर बोलताना मुनगंटीवार यांनी आपल्या राम मंदिर आंदोलनातील सहभागाची आठवण करून दिली. ते म्हणाले, राम मंदिर उभारणीसाठी आपण अनेक वर्षे आंदोलन केले. कारसेवेत सहभागी झालो, लग्नाच्या स्वागत समारंभातही “मंदिर वही बनाएंगे” असा संकल्प केला होता. वनमंत्री असताना मंदिरासाठी सागवान लाकूडही पाठवले. मात्र, मंदिरातील दानपेटीत किंवा अन्यत्र चोरी झाली असेल, तर ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. देव त्याला त्याची शिक्षा देईलच, पण सरकार म्हणून कायद्यानेही कठोर कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अशा प्रकारच्या आरोपींना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया टाळली उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठण आणि आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले की, त्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. “जो कोणी रामरक्षा म्हणतो, त्याचे प्रभू राम रक्षण करतात. रामरक्षा पठण करणाऱ्यांचे रक्षण होईल, एवढाच माझा विश्वास आहे,” असे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. चंद्रपूरच्या राजकारणावर मौन; “मी साक्षीदार नव्हतो” चंद्रपूरमधील भाजपच्या संघटनात्मक बदलांबाबत आणि स्थानिक वादांबाबत विचारले असता मुनगंटीवार यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले की, त्या घटनांचा आपण साक्षीदार नव्हतो. त्यामुळे संबंधितांनीच त्यावर प्रतिक्रिया द्यावी. आता चंद्रपूर जिल्ह्याची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. त्यामुळे त्या संदर्भातील सर्व प्रश्न त्यांनाच किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावेत. पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी विनोदी शैलीत उत्तर दिले, “फिजिक्सच्या पुस्तकात केमिस्ट्रीचा धडा वाचू नका. मी बोलणार नाही, अशी प्रतिज्ञाच केली आहे.” “संघटनेत हस्तक्षेप नाही; पण जनतेचे प्रश्न सोडवणार” संघटनात्मक राजकारणापासून आपण अलिप्त राहत असलो तरी जनतेच्या प्रश्नांवर मात्र पूर्वीप्रमाणेच काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धान बोनस, वैधानिक विकास मंडळ, उद्योग, बेरोजगारी, पिण्याचे पाणी आणि विदर्भाच्या विकासासंबंधी सर्व प्रश्न आपण सातत्याने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. “पक्षाने तिकीट दिले, पण जनतेने निवडून दिले. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे ही माझी जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले. वैधानिक विकास मंडळासाठी ५१ आमदारांचे निवेदन विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वैधानिक विकास मंडळ पुन्हा स्थापन करण्याच्या मागणीवरही त्यांनी माहिती दिली. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी 51 आमदारांच्या सह्यांचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले. दहा तारखेनंतर अमित शाह यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मला चंद्रपूरपुरते मर्यादित करू नका” चंद्रपूरमधील राजकीय घडामोडींवर सतत प्रश्न विचारले जात असल्याबद्दलही मुनगंटीवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. “महाराष्ट्र इतका मोठा आहे. मला फक्त चंद्रपूरपुरते मर्यादित करू नका. चंद्रपूरचे वाघ देशभर प्रसिद्ध आहेत; त्यांना पिंजऱ्यात बंद करू नका,” असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत नागपूरमधील वीज विभागातील कर्मचाऱ्यांचे दीड वर्षांपासून थकीत असलेल्या देयकांचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात त्यांनी मुख्य अभियंत्यांशी चर्चा केली असून, संबंधित कर्मचाऱ्यांचे थकीत पैसे लवकरच मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. नागपूरसह विदर्भातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण सातत्याने काम करत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Source link
कर्जमाफीत एकही शेतकरी वंचित राहणार नाही:राम मंदिरातील चोरांना योगी सरकार सोडणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा विश्वास