![]()
परिसरात शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे गावातील अंगणवाडी परिसराला घाणीच्या आणि दुर्गंधीच्या साम्राज्याने वेढले असून, लहान बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा रस्ता प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा आणि लहान मुलांच्या अंगणवाडीचा मार्ग आहे. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे या घाणीचा चिखल झाला असून सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळा सुरू झाला की या रस्त्यावर पाणी तुंबणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे दरवर्षी नागरिकांना याच नरकयातनांना सामोरे जावे लागत आहे, अशी खंत ग्रामस्थ एकनाथ पिंपळे यांनी व्यक्त केली. या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन खराब झालेल्या रस्त्यांवर भराव टाकावा, पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य गटारांची व्यवस्था करावी, रस्ता स्वच्छ कारावा आणि रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी एकनाथ पिंपळे, राजू पिंपळे, यासीन पठाण, याकूब पठाण, शामराव मोरे, प्रतीक मोरे, रखमाजी मोरे, बाबासाहेब मोरे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला शनिवारच्या संततधार पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचून मोठमोठी तळी निर्माण झाली आहेत. विशेषतः नगरखाना परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने हे साचलेले पाणी अनेक दिवस कायम राहते. परिणामी, परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Source link
घाटनांद्र्यात अंगणवाडीजवळ घाणीचे साम्राज्य; बालकांचे आरोग्य धोक्यात:शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस; नगरखाना परिसरात साचले पाणी