![]()
तालुक्यातील विरमगाव येथील मुख्य रस्त्याची गेल्या तीन दशकांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ३० वर्षांत या रस्त्याचे साधे डांबरीकरणही होऊ शकले नाही ही अत्यंत संतापजनक बाब आहे. या खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांना रोज नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. १९९५-९६ या काळात अशोक पाटील डोणगावकर मंत्री असताना या विरमगाव मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आज तब्बल ३० वर्षे उलटूनही या रस्त्याकडे एकाही लोकप्रतिनिधीने फिरून पाहिलेले नाही. परिणामी, हा रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर केवळ मोठमोठे खड्डे, खड्ड्यात पाण्याचे तळे आणि चिखलाचे साम्राज्य उरले आहे. विशेष आणि आश्चर्याची बाब म्हणजे विरमगाव हे राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक गाव मानले जाते. गावातील जवळपास अर्धे लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख पदांवर कार्यरत आहेत. गावातील अनेक मान्यवर नेत्यांची थेट मंत्री, खासदार, आमदार आणि पक्षांच्या सर्वोच्च प्रमुखांशी जवळीक आहे. एवढे असतानाही स्वतःच्या गावातील मुख्य रस्ता तीस वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. यावरून नेत्यांची गावाच्या विकासाप्रति असलेली अनास्था स्पष्टपणे दिसून येते. विरमगावातील नेत्यांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आगामी काळात जर या रस्त्याचे काम तात्काळ सुरू झाले नाही तर संतप्त ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. विरमगावच्या मुख्य रसत्यावर अशा प्रकारे पाणी साचले असून शाळकरी मुले, नागरिक व एसटी चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास; एसटी चालकांसाठी डोकेदुखी दररोज विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी गावात एसटी बस येते. मात्र, रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की, चालकाला बस चालवताना मोठी कसरत करावी लागते. बस थांब्यावर उभी राहिल्यावर विद्यार्थ्यांना चिखल तुडवत आणि साचलेल्या गढूळ पाण्यातून वाट काढत बसमध्ये चढावे लागते. शासनाकडून शिक्षणासाठी सोयी असल्या तरी हा खराब रस्ता विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे.
Source link
विरमगाव रस्त्याची 30 वर्षांपासून दुरवस्था; विद्यार्थी, नागरिकांचे हाल:1995 नंतर रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत, दुरुस्तीची मागणी