![]()
यशाला कोणताही शॉर्टकट नसतो; कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणताही विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही अपार क्षमता असून योग्य ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केल्यास पोलीस, प्रशासकीय सेवा, तसेच विविध शासकीय क्षेत्रांतील उच्च पदे सहज गाठता येतात, असा विश्वास पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांनी व्यक्त केला. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकत पुढे जाण्याचा आणि समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्यावतीने शिर्डी येथील शुभारंभ लॉन्स व मंगल कार्यालयात विद्यार्थी गुणगौरव व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संघटनेचे राज्य सचिव प्रा. विलास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात कार्याध्यक्ष अरुण भालेकर, उपाध्यक्ष गोपाल राऊत, धनराज वेलणकर, राजेश नागापुरे, प्रमोद वेलकर माजी मुख्याध्यापक तानाजी शेटे आदी उपस्थित होते. राज्य कार्याध्यक्ष अरुण भालेकर म्हणाले, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यावेळी समाजातील समाजरत्न पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना जर कमी वयात व कमी खर्चात नोकरीला मिळवायची असेल तर त्यांनी दहावीनंतर किंवा बारावीनंतर लगेच एअरफोर्स, नेव्हीफोर्स, आर्मी किंवा पोलीस यामध्ये प्रयत्न करावा. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या विद्यार्थ्यांनी जेईई, नीट याची तयारी करून डॉक्टर, इंजिनियर, वकील, किंवा उच्च शिक्षण घेऊन उच्च पदे मिळवावीत. जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर यांनी प्रास्ताविक केले. सुभाष तमानके व आदिनाथ भालेकर यांनी सूत्रसंचालन केले. आदिनाथ भालेकर यांनी आभार मानले.
Source link
सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजन व परिश्रमाच्या बळावर मिळते यश:पोलीस उपायुक्त इंगळे यांचे प्रतिपादन; पुरस्कार वितरण उत्साहात