![]()
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी पालखी मार्गावर चोख विद्युत सुरक्षा ठेवण्यासाठी विविध कामांचा आढावा घेतला. सुरक्षेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान काही दिवसांवर आले आहे. या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालखी मार्ग, विसाव्याची ठिकाणे आणि मुक्कामाच्या स्थळांवर विद्युत सुरक्षा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. औंढेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण पालखी मार्गाचे पुन्हा एकदा ‘वॉक डाऊन’ सर्वेक्षण करून विद्युत सुरक्षेचे ‘ऑडिट’ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पुणे परिमंडलाच्या या आढावा बैठकीचे आयोजन गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’ सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मुख्य अभियंता (वितरण) अंकुर कावळे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, संजय वाघमारे यांच्यासह सर्व कार्यकारी व उपविभागीय अभियंते उपस्थित होते. औंढेकर यांनी सांगितले की, आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी पायी चालतात आणि पादुकांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे पालखी सोहळ्याचा मार्ग, विसावा आणि मुक्कामाची ठिकाणे येथे वीज यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महावितरणसाठी ही ‘माऊलींची सेवा’ करण्याची संधी आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व रोहित्रांना शॉक प्रूफ एफआरपी कुंपण घालण्यात यावे. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वीजवाहिन्यांची उंची वाढवून, त्यांच्या खाली योग्य ‘गार्डिंग’ची (सुरक्षा जाळी) व्यवस्था करावी. मुक्कामाच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत वीज खंडित होऊ नये यासाठी पर्यायी वीजपुरवठ्याची यंत्रणा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी वीज यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गेल्या तीन महिन्यांतील पुणे परिमंडलातील वीजपुरवठ्याचा आढावा घेताना काही भागांत दीर्घकाळ वीज खंडित झाल्याच्या प्रकारांवर औंढेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होतो आणि महावितरणचे महसूलही बुडतो, असे त्यांनी नमूद केले. संबंधित अभियंत्यांना कडक शब्दांत ‘अल्टिमेटम’ देत, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यापुढे वीजपुरवठा खंडित होण्यामागे कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची हयगय आढळल्यास ती अजिबात सहन केली जाणार नाही आणि संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला.
Source link
आषाढी वारीत विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या:महावितरण संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश; हयगय झाल्यास कारवाई