![]()
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने यंदाही सात पिण्याच्या पाण्याचे टँकर रवाना केले आहेत. पिंपळे गुरव येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात संत-महंत आणि मान्यवरांच्या हस्ते या टँकरांचे पूजन करून ते वारकऱ्यांच्या सेवेत पाठवण्यात आले. या कार्यक्रमात दिंडी प्रमुखांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. तसेच, निसर्गाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ५०० हून अधिक वृक्षरोपांचे मोफत वाटपही करण्यात आले. पिंपरी-चिंचवडचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, उद्योजक बाळासाहेब काटे, ह.भ.प. ज्ञानेश्वर (छोटे माऊली) कदम महाराज, श्री क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशिद पाटील, राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ महाराज, न्यायाधीश रमेश उमरगेकर आणि संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचा टोपी, उपरणे आणि ‘ज्ञानेश्वरी’ व ‘तुकाराम गाथा’ ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. हे टँकर आळंदी ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या सोपानकाका कराडकर दिंडी (क्र. ११), स्वयंभू श्रीराम प्रभू दिंडी (क्र. ३३६), कमळेश्वर दिंडी, धोंडुजीबुवा चिझघरकर दिंडी (क्र. १८), बाबूराव तांदळे महाराज दिंडी (क्र. १९७) या दिंड्यांसोबत सेवा देतील. याशिवाय, देहू ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या नवलाख उंब्रे दिंडी आणि रोकडोबा दादा दिंडी (क्र. २०) यांनाही या टँकरद्वारे पाणी पुरवले जाईल. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले की, हे त्यांच्या अविरत लोकसेवेचे दशकपूर्ती वर्ष आहे. वारी मार्गावर वारकऱ्यांना मोफत आणि शुद्ध पाणी पुरवण्यासोबतच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जलसेवेसोबतच वृक्षदानाचा संकल्प केला आहे. ह.भ.प. छोटे माऊली कदम महाराज आणि डॉ. गजानन वाव्हळ महाराज यांनी अरुण पवार यांच्या सामाजिक व पर्यावरणीय कार्याचे कौतुक केले. या उपक्रमासाठी स्थानिक हास्ययोग परिवार, नवचैतन्य हास्य क्लब आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत केली असून, वारकरी वर्गातून या मोफत जलसेवेचे स्वागत व कौतुक होत आहे.
Source link
मराठवाडा जनविकास संघाकडून वारकऱ्यांसाठी 7 पाण्याचे टँकर रवाना:दशकपूर्तीनिमित्त 500 हून अधिक वृक्षरोपांचेही वाटप