![]()
धर्मांधता हे राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षेपुढील मोठे आव्हान आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित कार्यकर्ते आणि ‘माय होम इंडिया’ संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले. शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. देवधर म्हणाले की, भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. भारताची मूळ संस्कृती नाकारून अनेकांनी त्यांचे धर्म, संस्कृती आणि परंपरा भारतीयांवर लादण्याचा प्रयत्न केला. आजही ही धर्मांधता राष्ट्रीय सुरक्षा आणि एकात्मतेसमोरील आव्हान आहे. ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव देखील आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा मुक्तांगण इंग्लिश मीडियम शाळेच्या दादासाहेब केतकर सभागृहात पार पडला. याप्रसंगी ज्ञान प्रबोधिनीचे संचालक आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. गिरीश बापट, डॉ. नलिनी मोहन गुजराथी, जयंत गुजराथी आणि कन्हैयालाल गुजराथी यांच्यासह पुरस्कारार्थी उपस्थित होते. यावेळी उद्योग क्षेत्रासाठीचा स्व. चिमणलाल गोविंददास उद्यमगौरव पुरस्कार तौरल इंडिया, पुणेचे भरत गिते यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांचे बंधू रामराव गिते यांनी हा पुरस्कार स्वीकारला. व्यापार क्षेत्रासाठीचा उद्यमगौरव पुरस्कार जयहिंद, पुणेचे दिनेश जैन यांना देण्यात आला. सामाजिक क्षेत्रासाठीचा स्व. चिमणलाल गोविंददास सेवागौरव पुरस्कार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कारी येथील ‘कुंजवन सामाजिक सेवा संस्थे’चे माधव गोडबोले यांना प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रासाठीचा सेवागौरव पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील ‘मिल के चलो’ असोसिएशनचे अनिरुद्ध पाटील यांना मिळाला. या पुरस्कारांचे हे २९ वे वर्ष असून, प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख असे आहे. ‘राष्ट्रीय एकात्मतेपुढील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करताना सुनील देवधर यांनी फाळणीच्या काळातील परिस्थितीवर प्रकाश टाकला. फाळणीच्या वेळी संपूर्णतः मुस्लिम राष्ट्र वेगळे आणि हिंदू राष्ट्र वेगळे करण्याची मागणी होत होती. पाकिस्तानात राहणाऱ्या गैर-मुस्लिमांनी भारतात यावे आणि भारतातील मुस्लिमांनी पाकिस्तानात जावे, अशी मागणी जोर धरत असताना महात्मा गांधींनी पाकिस्तानातील गैर-मुस्लिमांचे भारतात स्वागत केले, मात्र भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानात पाठविण्यास विरोध केला, असे देवधर म्हणाले. आज याच मुस्लिमांसह ख्रिश्चन आणि डाव्या विचारसरणीचे अनुयायी भारतासमोर विविध आव्हाने निर्माण करत आहेत, असे देवधर यांनी नमूद केले. युरोपसारख्या देशांमध्ये मुस्लिमांना हद्दपार करण्याच्या मागणीसाठी मोठे मोर्चे निघत आहेत. भारतातही परिस्थिती कठीण झाली असून, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ यांसारखे विषय डोके वर काढत आहेत, असे त्यांनी सांगितले.
Source link
धर्मांधता राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हान – सुनील देवधर:'माय होम इंडिया' संस्थापकांचे पुरस्कार वितरणप्रसंगी मत