Headlines

विकासाचा गाजावाजा करणाऱ्यांनी पडलेला विकास पाहावा:मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिंदेंवरही साधला निशाणा




मुंबई-पुणे प्रवासातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर दोन खड्डे पडलेत, पण आज त्यांनी स्वतः जाऊन पाहावे; खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. भाजपच्या राजवटीत विकासाच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. “भाजपच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक शहराची सध्या पावसात काय दैना झालीये, हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोट घालून फिरून पाहावे. विकासाचा फार गाजावाजा करतात, पण यामागे दलाली आणि बेफिकिरी दडली आहे,” असे राऊत म्हणाले. टक्केवारीचे सरकार “आपले कोण काय वाकडे करणार? आमच्याकडे बहुमत आहे, या अहंकारात हे सरकार आहे. ठेकेदारांकडून ३०-३५ टक्के आधीच घेतलेले आहेत. ठेकेदारांनी भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेत आणि उरलेला टक्का मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळाला आहे. ज्या विकासाचे तुम्ही ढोल वाजवले, तो पाहायला मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब तिथे जावे. या विकासाच्या धक्क्यानेच उपमुख्यमंत्र्यांना (एकनाथ शिंदे) अजीर्ण झाले असून ते आजारी पडले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्रावर दुर्योधनाचे राज्य मुंबईतील अपघातांच्या सत्रावरून आणि मानखुर्द दुर्घटनेवरून संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौर आणि भाजप नेत्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. “मुंबईत काल मानखुर्दमध्ये सहा निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. लोकांचा आक्रोश सुरू असताना मुंबईच्या महापौर दिवसभर फोटो काढत फिरत आहेत. माणसे मेली तरी या एका बिल्डरच्या घरच्या बारशाला गेल्या होत्या. तर दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम फिदीफिदी हसत आहेत.” “मुंबई आणि महाराष्ट्रावर सध्या दुर्योधनाचे राज्य आलेले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी राज्याची अत्यंत वाईट अवस्था करून ठेवली आहे. तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांविषयी तर बोलण्याचे काही कारणच नाही, कारण राज्यात काय चालले आहे हे त्यांना कळतच नाहीये. नशीब काल हे आमीर खानच्या लग्नाला गेले नाहीत,” अशी खोचक टीका त्यांनी केली. सीतामाईचे मंगळसूत्रही लुटले; आता महाराष्ट्रात आंदोलनाचा वणवा पेटणार राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्द्यावर केलेल्या सोशल मीडिया पोस्टचे समर्थन करत संजय राऊत यांनी भाजपवर थेट ‘दरोडेखोर’ असल्याचा आरोप केला. “इतिहासात मोगलांनी आणि गझनवीने मंदिरे लुटल्याची नोंद आहे. भाजप स्वतःला मंदिराचे रक्षक दाखवून मते मागत होते, पण आज राम मंदिर, केदारनाथ-बद्रीनाथ लुटणारे चोर आणि दरोडेखोर भाजपचेच लोक आहेत. २७ महिला भक्तांनी सीतामाईला अर्पण केलेले सोन्याचे मंगळसूत्रही या लोकांनी लुटले,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. “शिवसेनेने काल दादरमध्ये ‘रामरक्षा आंदोलना’च्या माध्यमातून शंख फुकला आहे. हे आंदोलन फक्त एका दिवसाचे नव्हते, तर आता संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *