Headlines

सलग 300 रविवार शहरात राबवले स्वच्छता अभियान:धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा सलग ३०० रविवार स्वच्छतेचा विक्रम




धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगाव यांच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाने रविवारी ऐतिहासिक टप्पा गाठला. सलग ३०० व्या रविवारी भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मंदिर परिसरातील सुमारे पाच ते सहा टन कचरा, प्लास्टिक, झुडपे आणि गवत हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, धर्मवीर युवा प्रतिष्ठानने मागील सहा वर्षांपासून सलग ३०० रविवारी शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबवत नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, शाळा, क्रीडांगणे स्वच्छ करून त्यांनी समाजात स्वच्छतेची प्रभावी जनजागृती केली आहे. आज सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणारे अनेक जण दिसतात; मात्र प्रत्यक्ष कृती करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. अनेक अडचणींवर मात करत सलग ३०० आठवडे एकही रविवार न चुकवता स्वच्छता करणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. नागरिकांनीही आपल्या घरापासून आणि परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करून शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. या स्वच्छता अभियानात आयुक्त यशवंत डांगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे, नगरसेवक निखिल वारे, ॲड. युवराज शिंदे, सतीश शिंदे, गोरख पडोळे, संजय ढोणे, उदय अनभुले, यांच्यासह कल्याण रोड स्वच्छता मोहीम ग्रुप, अहिल्यानगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटना, हर दिन मॉर्निंग ग्रुप, भिंगार तसेच धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रा. भगवान काटे म्हणाले, प्रतिष्ठानचे स्वच्छतेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. अहिल्यानगर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रतिष्ठानने घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या ३०० आठवड्यांच्या अखंड स्वच्छता अभियानाचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *