![]()
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली असून, मुंबईत पर्यटनासाठी येऊ नका, अन्यथा सक्तीची पावले उचलावी लागतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना महामार्ग बंद अतिवृष्टी आणि काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर अत्यंत गंभीर परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, पुढील आदेश मिळेपर्यंत या दोन्ही मार्गांवरील वाहतूक दोन्ही दिशांनी पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी या मार्गावर प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ‘पर्यटन करू नका, अन्यथा सक्ती करावी लागेल’ राज्यातील पावसाच्या सद्यस्थितीवर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना सक्त ताकीद दिली आहे. ते म्हणाले, “राज्यात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. मुंबईत वाऱ्यांचा वेग ७० ते ९० किलोमीटर प्रतितास झाला असून झाडं उन्मळून पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मुंबईत बाहेर गर्दी करून पर्यटन करू नये. धबधब्यांच्या ठिकाणी जाऊन काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जर लोकांनी ऐकलं नाही, तर आम्हाला सक्ती करावी लागेल.” ‘राजकारण करू नका, सहकार्य करा’ या नैसर्गिक आपत्तीच्या काळात विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहनही महाजन यांनी केले आहे. मानखुर्द येथे ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, “लोक विचलित होतील असे विरोधकांनी वागू नये. कुठे पाणी गळायला लागलं तर लगेच राजकारण करू नये. आज आणि उद्या रेड अलर्ट असल्याने सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.” मुंबईसाठी विशेष निर्देश: खासगी कर्मचाऱ्यांना WFH, सरकारी कार्यालयांना सुट्टी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला आहे. ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) आणि मुंबई महापालिकेने तातडीचे निर्देश जारी केले आहेत: खासगी कार्यालये: शहरातील सर्व खासगी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शक्य असेल तेथे घरातून काम करण्याची (Work From Home) मुभा द्यावी. सरकारी कार्यालये: अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आज अर्धा दिवसच सुरू राहतील. दुपारनंतर कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि अधिकृत सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. हेही वाचा.. मुंबई-पुण्यातील घटनांवरून विधानसभेत विरोधक आक्रमक:मुख्यमंत्री म्हणाले – राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची; उद्या देणार पूर्ण निवेदन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील विविध दुर्घटनांवरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे उद्या पूर्ण निवेदन देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सविस्तर वाचा.. मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा कहर:रेड अलर्टनंतर ‘वर्क फ्रॉम होम’, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, 5 जिल्ह्यांत शाळा-बंद, एसटी सेवा स्थगित राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, नाशिकसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते, पूल आणि महामार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे निर्देश दिले असून अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने अधिकृत अधिसूचनाही जारी केली आहे. सविस्तर वाचा
Source link
पावसाचा रेड अलर्ट अन् मुंबई-पुणे मार्ग ठप्प:दरड कोसळल्याने वाहतूक स्थगित; मंत्री गिरीश महाजन म्हणाले- पर्यटनाचा मोह टाळा