![]()
पुणे वन विभागाने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राजगड, सिंहगड, लोणावळा परिसरासह अनेक पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी काही धोके निर्माण झाले आहेत. यामध्ये दरड कोसळणे, दगड घसरणे, झाडांच्या फांद्या तुटणे, तसेच धबधबे, ओढे आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढणे यांसारख्या घटनांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वन विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, पर्यटकांनी धबधबे, ओढे, नाले आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरू नये. दरडप्रवण, घसरडे तसेच कड्यालगतचे धोकादायक भाग टाळावेत. धबधब्यांच्या माथ्यावर, कड्यांच्या टोकावर किंवा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे टाळावे. सेल्फी किंवा छायाचित्रणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. अतिवृष्टी, दाट धुके किंवा विजांचा कडकडाट सुरू असल्यास पर्यटन टाळावे. वन विभागाने लावलेले इशारा फलक, सुरक्षा सूचना आणि कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मद्यपान करून पर्यटनस्थळी वावरू नये आणि लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे. वनक्षेत्रात कचरा टाकू नये, तसेच पर्यावरणास हानी पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये. वन्यजीवांना त्रास होईल असे वर्तन टाळण्याचे आवाहनही वन विभागाने केले आहे. पावसाळ्याच्या काळात हवामानात अचानक बदल होऊन धबधबे, ओढे आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी व प्रवाह काही मिनिटांत वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगून जबाबदारीने पर्यटन करावे, असे वन विभागाने म्हटले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात, मार्ग चुकणे, वनाग्नी, वन्यप्राणी संबंधित घटना किंवा इतर मदतीची आवश्यकता भासल्यास, वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. या संदर्भात पुणे विभागाचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस म्हणाले, “पावसाळा हा निसर्गाचा उत्सव आहे. सर्व पर्यटक, ट्रेकर्स आणि पर्यावरणप्रेमींनी निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा; मात्र स्वतःची सुरक्षितता, वनक्षेत्रातील नियम आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचे भान ठेवून जबाबदार पर्यटनाला प्राधान्य द्यावे.”
Source link
पावसाळी पर्यटनात जीव धोक्यात घालू नका!:राजगड–सिंहगड परिसरासाठी वन विभागाचा महत्त्वाचा इशारा