Headlines

मुंबई एटीसी कोंडीमुळे नागपूर विमानतळाला फटका:मुंबई-नागपूर विमान रद्द, इतर विमानांना मोठा विलंब




मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कोंडीमुळे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून नागपूरला येणारी आणि जाणारी अनेक विमाने विलंबाने धावत आहेत, तर काही रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोंडीमुळे इंडिगोचे मुंबई-नागपूर-मुंबई दरम्यान धावणारे ‘६इ-६८०२/५१७५’ हे विमान तांत्रिक आणि ऑपरेशनल कारणांमुळे रद्द करण्यात आले. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. रद्द करण्याव्यतिरिक्त, इतर विमानांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. मुंबईहून नागपुरात सकाळी ९:३० वाजता येणारे ‘६इ-६०५८/६१४५’ हे विमान सकाळी ११:०५ वाजेपर्यंत पोहोचले नव्हते. तसेच, सकाळी ११:४० वाजता नागपुरात येणारे ‘६इ-२०६०/५३४४’ हे विमानही मुंबईतील गर्दीमुळे रखडले. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या विमानाची सद्यस्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिन्यात, जूनमध्ये, मान्सूनच्या सुरुवातीच्या जोरदार पावसामुळे आणि मुंबई-पुण्यातील खराब हवामानामुळे विमानांना हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या होत्या. जूनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अनेक विमाने ३० मिनिटे ते १ तास उशिराने धावली होती. काही विमानांना तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली आणि मुंबईहून येताना विलंब झाला होता. या कोंडीचा फटका नागपूरच्या लोकप्रतिनिधींनाही बसला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस आमदार विकास ठाकरे, हिंगण्याचे आमदार समीर मेघे, भाजप आमदार प्रवीण दटके आणि आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी आपली सोमवारची मुंबईवारी रद्द केली. हे सर्व नेते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला निघाले होते. विमानांच्या प्रचंड विलंबामुळे त्यांना आजच्या कामकाजाला मुकावे लागले. आता त्यांनी मंगळवारी मुंबईसाठी रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *