Headlines

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी




मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दगड व माती खाली आली. या घटनेत कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मात्र, एंट्री पॉईंट परिसरातील शोसाठी असलेल्या स्लॅबचा तसेच संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून खाली पडण्याचा प्रकार घडला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे डोंगराच्या माथ्यावर नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे अचूक निरीक्षण करणे शक्य होत नाही. पाऊस ओसरल्यानंतर तज्ज्ञांकडून सविस्तर तांत्रिक पाहणी करण्यात येईल. पाण्याच्या प्रवाहात नेमका कशामुळे बदल झाला आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचा निर्णय त्यानंतर घेतला जाईल. दरम्यान, रस्त्यावर पडलेला स्लॅब व इतर मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. रस्ता वाहतुकीसाठी सुरू करायचा अथवा नाही, याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस प्रशासन आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त पाहणी व सुरक्षा मूल्यमापनानंतर घेतला जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व निर्णय घेतले जातील, असेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *