![]()
पुण्यात केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आणि निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’, ‘गुलाबो गँग’ आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संशयित आरोपी सिया गोयल हिच्या मार्केट यार्ड येथील लीलाकुंज निवासस्थानाबाहेर ‘जोडे मारो’ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी आरोपी सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांच्या कथित वर्तनावर तीव्र संताप व्यक्त केला. संगीता तिवारी आणि रुपाली पाटील यांनी सांगितले की, पोलीस तपास सुरू असतानाही सिया गोयलने प्रसारमाध्यमांसमोर आक्षेपार्ह आणि उद्धट वर्तन केले. माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर ‘मधले बोट’ दाखवून तिने केलेल्या हावभावांमुळे जनभावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा वर्तनामुळे न्यायव्यवस्थेचा आणि सुसंस्कृत समाजाचा अपमान झाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी आरोपीच्या कुटुंबीयांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलकांनी म्हटले की, इतकी गंभीर घटना घडली असताना आणि सियाने उद्धटपणा दाखवला असतानाही, तिचे वडील तिची उघडपणे बाजू घेत आहेत. समाजातून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न चुकीचा असून, ही विकृती वेळीच थांबवणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीने स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू नये. सत्य समोर येण्यासाठी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलनाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. त्यानंतर प्रतीकात्मक स्वरूपात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा समारोप “रघुपती राघव राजाराम” हे भजन गाऊन करण्यात आला. यावेळी आरोपी व तिच्या कुटुंबीयांना सद्बुद्धी लाभावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली. ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ आणि ‘गुलाबो गँग’ यांच्या वतीने पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबावाशिवाय या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा, अशी मुख्य मागणी करण्यात आली. दोषी कितीही प्रभावशाली असला तरी त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा इशाराही आंदोलकांनी प्रशासनाला दिला.
Source link
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:पुण्यात संशयित आरोपी सियाच्या घराबाहेर गुलाबो गँगचे 'जोडे मारो' आंदोलन, निष्पक्ष तपासाची मागणी