![]()
औंढा नागनाथ पंचायत समितीमधील ५७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला गटविकास अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे अंंतिम संधी देण्याचे पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने आता जिल्हा परिषदेकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे औंढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेमध्ये तब्बल ५७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाच्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल लेखा विभागाने ता. २८ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषदकडे सादर केला होता. यामध्ये गटविकास अधिकाऱ्यासह पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी व रोखपाल याच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणात चौघांनाी निंलबीत केले. त्यानंतर या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ता. ६ ऑक्टोबर २०२५, ता. ८ डिसेंबर २०२५, ता. २४ एप्रिल २०२६ रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी औंढा पंचायत समितीकडे पत्र दिले होते. या पत्राला गटविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. दरम्यान, या अपहार प्रकरणात दोषी गटविकास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी ता. २ जुलै रोजी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन अंतिम संधी दिली होती. तीन दिवसांत गुन्हे दाखल करावेत तसेच त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र या पत्रालाही गटविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असून अद्यापपर्यंत गुन्हे दाखल झालेच नाहीत. त्यामुळे आता या प्रकरणात जिल्हा परिषदेकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे औंढा नागनाथ तालु्क्याचे लक्ष लागले आहे.
Source link
औंढा पंचायत समिती अपहार प्रकरण:सीईओंच्या पत्राला बीडीओकडून केराची टोपली, अंतिमपत्र देऊनही कारवाई होईना