![]()
राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी सुरू असून सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे, या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, स्थलांतरित केलेल्या नागरिकांना अन्न, शुद्ध पेयजल, पांघरुण, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. डोंगरकपाऱ्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू अतिवृष्टी व देण्यात आलेला इशारा या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकानिहाय यंत्रणांशी संवाद साधून संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा आढावा घेऊन पालकमंत्री देसाई म्हणाले, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. 24×7 तास सेवेसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध ठेवावेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाऊन संवाद साधावा. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये व आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासकीय यंत्रणांची पथके तयार करावीत. या पथकांनी संवेदनशील ठिकाणी भेटी द्याव्यात. दरड कोसळण्याच्या ठिकाणी यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, असे निर्देश देसाई यांनी दिले. शंभूराज देसाई म्हणाले, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. महाबळेश्वर प्रमाणेच पाटणच्या पश्चिम भागातही हेळवाक, नवाजा, कोयनानगर, आटोली, बामणेवाडी यासह अन्य गावांमध्ये मुसळधार पाऊस पडतो. या ठिकाणी दरडी कोसळणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे असे प्रसंग होतात त्यामुळे सर्व क्षेत्रीय यंत्रणांनी अलर्ट राहून काम करावे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याबाबत काटेकोरपणे दक्षता घ्यावी. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी व्यवस्था उभी करावी. कोयना वसाहतीच्या ठिकाणी असणाऱ्या जलसंपदा विभागाच्या शासकीय निवासस्थानांची स्वच्छता व दुरुस्ती करून सुव्यवस्थित ठेवावीत जेणेकरून आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करता येईल, असे निर्देश देऊन देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे असल्यामुळे अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. सडावाघापूरचा उलटा धबधबा, ओझर्डे, लिंगमळा, ठोसेघर तसेच महाबळेश्वर मधील एलिफंट पॉईंट, आर्थर सीट पॉईंट या सारख्या ठिकाणी थोड्याशा पावसानेही चिखल होऊन तेथील भाग निसरडा होतो अशा ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये. सखोल पाण्यात हुल्लडबाजी करू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेऊन आदेश निर्गमित करावेत. पावसामुळे काही ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळणे या सारखे प्रकार घडण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी ऑपरेटरची यादी संपर्क क्रमांकासह अद्यावत ठेवावी, शाखा अभियंता व सरपंच यांना उपलब्ध करून द्यावी. महावितरण कंपनीने नादुरुस्त विद्युत तारा, खांब आणि डीपी यांची त्वरित दुरुस्ती करावी. वायरमन, तांत्रिक यंत्रणा यांनी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने ग्रामीण भागात पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा. वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी यांनी नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत राहावे. रुग्णवाहिका सुसज्ज ठेवाव्यात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डोंगरी भागात साप चावण्याच्या घटना घडतात, उपचारासाठी आवश्यक ती लस उपलब्ध ठेवावी, असेही निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्यातील 11, वाई तालुक्यातील 17 लोकांचे नातेवाईकांकडे स्थलांतर करण्यात आले आहे, जिल्ह्यात पाटण, सातारा, खंडाळा या तालुक्यातील 24 घरांची पडझड झाली आहे, ताथवडे घाटात दगड सैल होऊन गाडीवर पडल्याने फलटण तालुक्यातील एक व्यक्ती मयत झाली आहे, तर खंडाळा तालुक्यातील 2 शेळ्या मयत झाल्या आहेत अशी नुकसानीची प्राथमिक माहिती दिली. संभाव्य अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची पथक कराडमध्ये तैनात ठेवण्यात आले आहे. पश्चिम घाटातील पाच तालुक्यातील तहसीलदार यांच्यासह सर्व यंत्रणा फिल्डवर आहे. दरडप्रवण ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे, असे सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव सातारा, पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली या पाच तालुक्यातील सर्व शाळांना 6 जुलै रोजी सुट्टी देण्यात आली आहे, असे सांगितले.
Source link
'साताऱ्यातील संवेदनशील भागातील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा':पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला सतर्कतेचे आदेश