![]()
पुणे, प्रतिनिधी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करत गणपती बाप्पाला अनोखी मानवंदना दिली. यावेळी गणेशभक्तांनी ‘माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ आणि ‘जय गणेश… गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष केला. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून आलेल्या शितोळे सरकार यांच्या मालकीचे हे दोन अश्व आहेत. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार) आणि श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार) तसेच अनेक पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शितोळे सरकार यांनी सांगितले की, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही एक विशेष भेट आहे. यंदाही गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व वारीला जातात. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देतात, ही एक शुभ परंपरा आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. ज्या भाविकांना वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत आणि यंदाही त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी ट्रस्टतर्फे वारीदरम्यान राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये मोफत रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा, हरित वारी आणि स्वच्छता अभियान यांचा समावेश आहे. ते म्हणाले की, या सर्व उपक्रमांची सुरुवात या मानवंदना कार्यक्रमातून होते आणि ट्रस्ट नेहमीच वारकऱ्यांच्या सेवेत असे उपक्रम राबवत राहील.
Source link
माऊलींच्या मानाच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना:मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करत विश्वस्त, कार्यकर्त्यांनी केले पूजन