Headlines

NCERTकडून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा निर्णय:ही मराठ्यांच्या बलिदानाची प्रतारणा, छत्रपती संभाजीराजेंचा संताप




नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या बदलामुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले असून, छत्रपती घराण्यासह शिवप्रेमी व इतिहासप्रेमींनी यावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात असल्याने सर्वस्तरांतून या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजी यांनी ट्विट करत म्हटले की, एनसीईआरटी ने पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस कारण न देता वगळला आहे. ही मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाची व राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रतारणा असल्याची टीका संभाजीराजे यांनी केली आहे. पुढे संभाजीराजे म्हणाले, मराठ्यांचे प्रभुत्व संपूर्ण देशावर होते, याबाबतच्या समकालीन पुराव्यांसह इतिहासकारांनी भाष्य केलेले आहे. मराठा साम्राज्याचा इतिहास व राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचे असलेले योगदान भावी पिढीस ज्ञात व्हावे, याकरिता मराठा साम्राज्याचा नकाशा पुनःश्च पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, या मागणीचे सविस्तर पत्र केंद्रीय शिक्षण मंत्री यांस पाठवले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कुणाच्या दबावाने हा नकाशा गायब करण्यात आला?- वृषालीराजे भोसले दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती घराण्याच्या वृषालीराजे भोसले यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज एकेकाळी अटकेपार फडकला होता. विशेषतः राजस्थानमधील मोहिमा आणि तिथल्या विजयामुळे मराठा साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या होत्या. हा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांसमोर असणे आवश्यक असताना, एनसीईआरटी ने नकाशा हटवल्याने हा इतिहास पुसण्याचा कट असल्याचे बोलले जात आहे. कोणाला वाटले म्हणून इतिहास पुसला जात नाही किंवा बदलला जात नाही. कुणाच्या दबावाने हा नकाशा गायब करण्यात आला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नसून आमचा स्वाभिमान आहे. राजस्थानमधील विजयाची वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे आहे. कोणत्याही दबावाखाली इतिहास बदलला जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *