![]()
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी मूर्तिजापूर पंचायत समितीला भेट देत पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा व योजनांचा बैठकीतून आढावा घेतला. बैठकीला त्यांच्यासोबत प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी राठोड, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, सहायक गटविकास अधिकारी इंगळे आदी उपस्थित होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामसेवकांना आपल्या मुख्यालयी राहण्याचे निर्देश सीईओंनी दिले. बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या सर्व योजना व विकास कामांचा सीईओ अनय नावंदर यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, बचतगट, ग्रामीण भागातील समस्या, पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत त्यांनी त्यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता टांग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कराळे व आरोग्य विभागाचे इतर अधिकारी, ग्रामसेवकांची उपस्थिती होती. बैठकीनंतर त्यांनी माना येथे आरोग्य उपकेंद्राला भेट देत सूचना केल्या. तसेच तेथील बचत गट प्रभाग संघाच्या कामकाजाची माहिती उमेदचे बचत गट व्यवस्थापक राठोड व प्रभाग संघाच्या पुंड यांच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी राजनापूर खिणखिणी येथे ग्रामपंचायतची पाहणी करत सूचना केल्या. तसेच गावातील अंगणवाडीला भेट दिली. त्यानंतर त्यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती. पंचायत समितीच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी असून त्याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. तर पंचायत समितीमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बऱ्याच कालावधीपासून बंदावस्थेत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेले बायोमेट्रिक नादुरुस्त आहेत. बंद पडलेले सीसीटीव्ही व बायोमेट्रिक यंत्रणा लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
Source link
सीईओंनी घेतला कामांचा आढावा; राजनापूरला भेट