![]()
शहर काँग्रेस कमिटी व समाज क्रांती आघाडीच्या संयुक्त विद्यमाने उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे संरक्षण, संवैधानिक हक्क अबाधित राखणे, उपवर्गीकरणाच्या विरोधात जनजागृती करणे या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली. विविध सामाजिक, राजकीय, विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते. परिषदेच्या शेवटी उपस्थितांनी संविधानाच्या संरक्षणासाठी, अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. काही राज्यांत अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आरक्षणाचा फायदा त्या त्या प्रवर्गातील काही निवडक जातींना झाला. मात्र इतर जाती उपेक्षित राहिल्या, असा मुद्दा मांडण्यात आला. याबाबत न्यायालयाने उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय दिला होता. त्यानंतर शासनाकडून समिती गठित करून अहवाल तयार करण्यात आला. मात्र अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात आवाज उठवण्यात येत आहे. स्वराज्य भवन येथे उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषद पार पडली. प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे, डॉ. गोपाल उपाध्ये, आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीचे सदस्य विशाल नंदागवळी, प्रीतम डोंगरे, अमित वाहुरवाघ आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून समाज क्रांती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बंडू वानखडे, अशोका फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम तिडके, संदीप खंडारे आणि फुले आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भोजने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संविधान व सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहन केले. अमित वाहुरवाघ व विशाल नंदागवळी यांनीही विचार मांडले. संविधान, सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, मागासवर्गीय समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती अधिक व्यापक करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या परिषदेचे आयोजन सुनील वानखडे, शीलवंत वानखडे यांनी केले. हंसराज शेंडे यांनी उपवर्गीकरणावर मार्गदर्शन केले. अनुसूचित जातींना भारतीय संविधानाने दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन आहे. त्यात कोणत्याही प्रकारची विभागणी अथवा उपवर्गीकरण करणे हे सामाजिक समतेच्या मूलभूत तत्त्वांवर आघात करणारे आहे. आरक्षण हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संघटितपणे लढा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाज क्रांती आघाडीचे दिवंगत नेते स्व. प्रा. मुकुंद खैरे हे काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीला मानणारे होते. आम्ही आजही देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संविधानाच्या लढाईत त्यांच्याबरोबर आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Source link
आरक्षणाच्या रक्षणासाठी लढणार; संवैधानिक हक्कासाठी करणार संघर्ष:उपवर्गीकरण विरोधी संघर्ष परिषदेत व्यक्त करण्यात आला निर्धार