पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी दुपारी अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा महाकाय डोंगर शेजारील प्रशासकीय इमारतीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकले होते. कालप
.
९ जणांची सुखरूप सुटका, ६ ते ७ जण अडकल्याची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त पथकाने रात्रभर बचावकार्य सुरू ठेवले आहे. या अथक प्रयत्नांनंतर आतापर्यंत ९ कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या आणि मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत आणि सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाच्या अंदाजानुसार अजूनही साधारण ६ ते ७ कर्मचारी या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून सर्व अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला जात आहे.
नेमकं काय घडलं होतं?
बुधवारी (८ जुलै) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास मोशी कचरा डेपोमध्ये हाहाकार उडाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचरा डेपोतील जुन्या कचऱ्याच्या महाकाय डोंगराचे अचानक भूस्खलन झाले. हा कचऱ्याचा डोंगर थेट शेजारील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. त्यावेळी इमारतीमध्ये अनेक कर्मचारी आपले काम करत होते. ढिगारा थेट इमारतीवर आदळल्याने ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि आतमध्ये काम करणारे कर्मचारी ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
अधिकृत आकड्यांची अद्याप प्रतीक्षा
या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक चर्चा कालपासून सुरू असली तरी, प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही मृत्यूला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष केवळ बचावकार्यावर केंद्रित आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या उर्वरित सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान, ही प्रशासकीय इमारत अधिकृत होती की अनधिकृत? तसेच हा अपघात केवळ मुसळधार पावसामुळे झाला की यात कोणाचा निष्काळजीपणा होता? याचा सविस्तर तपास दुर्घटनाग्रस्तांना बाहेर काढल्यानंतर केला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित बातमी वाचा..
मोशी कचरा डेपोत भीषण दुर्घटना:पुण्यात कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता, 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमध्ये बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन तो थेट ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या भीषण दुर्घटनेत अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. काही वृत्तांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सविस्तर वाचा..