![]()
दर्यापूर तालुक्यासह दुष्काळग्रस्त राज्यातील शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दर्यापूर तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आणि शेतमजुरांना उदरनिर्वाहासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासोबतच, पीक कर्जासह शेतीशी संबंधित पात्र कर्जांची संपूर्ण कर्जमाफी, पूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही माफी आणि कर्जवसुलीला नियमानुसार स्थगिती द्यावी, अशा मागण्याही रेटण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी डॉ. राजेश्वर हांडे आणि तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि महसूलमंत्री यांना निवेदन देण्यात आले. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी झालेल्या धावपळीत एसडीओ कार्यालयातील कुंड्यांची तोडफोड करण्यात आली, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल जळमकर, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
Source link
दर्यापुरात शेतकऱ्यांसाठी 50 हजार मदतीची मागणी, रास्ता रोको:सरकारच्या 5 हजारांच्या मदतीविरोधात रोष, एसडीओ कार्यालयातील कुंड्यांची तोडफोड