![]()
संत तुकाराम महाराज यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातिभेद आणि सामाजिक विषमतेवर परखड प्रहार करत अभंगांतून समता, माणुसकी आणि विवेकाचा संदेश दिला. त्यामुळे ते केवळ भक्तीपरंपरेतील संत नव्हे, तर समाजपरिवर्तनाची क्रांती घडविणारे क्रांतिकारक संत होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले. तालुक्यातील मोहाडी येथील गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित आणि कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशनच्या संयोजनाने आयोजित ‘श्रीकृष्ण व्याख्यानमाले’चे दुसरे पुष्प ‘क्रांतिकारक संत तुकाराम’ या विषयावर गुंफताना कोकाटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे होते. व्यासपीठावर मविप्र संचालक संदीप गुळवे, बापूसाहेब पाटील, शहाजी सोमवंशी, कौतिक पाटील आणि प्रवीण जाधव उपस्थित होते.ग्रामस्थांच्या वतीने हे व्याख्यानपुष्प कै. भाऊराव देवराम पाटील यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आले. श्रीमंत कोकाटे म्हणाले, संत तुकारामांनी अत्यंत सोप्या भाषेत सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून समता आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार केला. तत्कालीन समाजातील रूढी-परंपरांवर परखड भाष्य करत त्यांनी लोकांना जागृत केले. आधुनिक काळातही संत तुकारामांचे क्रांतिकारी विचार तितकेच मार्गदर्शक आणि गरजेचे आहेत. प्रास्ताविक प्रा. विलास देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले, तर धनंजय वानले यांनी आभार मानले.
Source link
अंधश्रद्धा, जातिभेदावर तुकारामांचा परखड प्रहार:माेहाडी येथील गाेपालकृष्ण व्याख्यानमालेत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांचे प्रतिपादन