![]()
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहायक अजित दशावतारी यांच्या १४ वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. पालकांनी रागावल्याच्या कारणावरून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. रविवारी पहाटे बारामती तालुक्यातील रुई येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवनी अजित दशावतारी असे मृत मुलीचे नाव आहे. दशावतारी कुटुंब बारामतीतील रुई परिसरातील “स्वामी समर्थ आयकॉन’ या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहते. शनिवारी (२२ ऑगस्ट) रात्री दहाच्या सुमारास पालकांनी अवनीला काही कारणास्तव रागावले होते. यानंतर रागाच्या भरात ती घरातून निघून गेली. पालकांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने रविवारी पहाटे ३:४० वाजता त्यांनी नातेवाइकांसह बारामती तालुका पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. इमारतीच्या बाजूला सापडला मृतदेह पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू असतानाच “डायल ११२’ वरील पोलिस कर्मचारी कृष्णा कांबळे यांना स्वामी समर्थ इमारतीच्या बाजूला एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली.माहिती मिळताच पोलिसांनी आणि नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाइकांनी खात्री केली असता ती अवनीच असल्याचे निष्पन्न झाले. पालकांनी रागावल्यामुळे तिने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Source link
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीने केली आत्महत्या:पालक रागावल्याने रागात टेरेसवरून उडी मारली