![]()
दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते; मात्र चालू वर्षात सोन्याचे दर जास्त असल्याने पारंपरिक २४ किंवा २२ कॅरेटचे दागिने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे झाले आहे. या महागाईवर ग्राहकांनी आणि सराफ व्यावसायिकांनी एक नवा मार्ग शोधून काढला आहे. यंदाच्या दिवाळीत २४ कॅरेटच्या पारंपरिक वजनी दागिन्यांऐवजी १८ कॅरेटच्या दागिन्यांना ग्राहकांची पहिली पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे, अत्याधुनिक फिनिशिंग आणि डिझायनिंगमुळे हे दागिने हुबेहूब २४ कॅरेटसारखेच दिसत असल्याने यंदा बाजारात याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. सध्या बाजारात हलक्या वजनाच्या (लाइटवेट) आणि आधुनिक डिझाइनच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. तरुणाई, नोकरदार वर्ग आणि मध्यमवर्गीय कुटुंबे सोन्याच्या सणाला खंड पडू न देता बजेट राखण्यासाठी १८ कॅरेट दागिन्यांची निवड करत आहेत. गुंतवणुकीसाठी यंदाही २४ कॅरेटकडेच कल कॅरेट म्हणजे सोन्याची शुद्धता मोजण्याचे माप. सोन्याचे विभाजन २४ भागांत केले जाते. २४ कॅरेट म्हणजे १०० टक्के शुद्ध सोने. २२ कॅरेट म्हणजे २२ भाग सोने आणि २ भाग तांबे/चांदी (९१.६% शुद्ध सोने). तर १८ कॅरेट (७५०) म्हणजे १८ भाग सोने आणि ६ भाग इतर धातू (७५ टक्के शुद्ध सोने). या तिन्हींमधील मुख्य फरक म्हणजे, २४ कॅरेट सोने हे सर्वाधिक शुद्ध असल्यामुळे ते केवळ गुंतवणुकीसाठी (नाणी किंवा बिस्किटे) खरेदी केले जाते. हे अत्यंत मऊ असल्याने याचे थेट दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे जरी दागिन्यांच्या बाबतीत १८ कॅरेटचा ट्रेंड असला, तरी शुद्ध सोन्यातील गुंतवणुकीचा कल नेहमीप्रमाणे २४ कॅरेटकडेच कायम आहे. १८ कॅरेटच्या राजकोट दागिन्यांना यंदा मागणी ^ सोन्याचे दर कितीही वाढले तरी सण-उत्सवात सोने खरेदीची परंपरा खंडित होत नाही. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन बाजारात १८ कॅरेटमध्ये मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस आणि ब्रेसलेट्सचे अप्रतिम पर्याय उपलब्ध झाले आहेत. बजेट आणि सौंदर्य यांचा मेळ बसत असल्याने यंदा १८ कॅरेटमधील राजकोट दागिन्यांना मोठी मागणी राहणार आहे. शिवाय टेंपल पॅटर्नलादेखील यंदा मोठी पसंती राहील. – संतोष वर्मा, जिल्हाध्यक्ष, सराफ सुवर्णकार संघटना.
Source link
यंदाच्या दिवाळीमध्ये 18 कॅरेट दागिन्यांची राहणार क्रेझ, सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने "18 कॅरेट'' ठरतेय नवा पर्याय