![]()
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्यावतीने १९ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची बुधवारी (दि.२१) काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. या उत्सवाचे औचित्य साधून चेन्नई येथील श्री साई ट्रस्टचे संस्
.
उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ५.५० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. त्यानंतर ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती करण्यात आली. सकाळी ६.५० वाजता संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व त्यांची पत्नी वैशाली दराडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा, तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांची पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली.
सकाळी १० वाजता कोल्हापूर येथील हभप राधिका गोपालकृष्ण कालेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर अभिराज कोते यांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात, मंदिरातील पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी १२.१० वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली. त्यानंतर पुणे येथील पद्मावती पारेकर व निनाद ग्रुप यांचा ‘भक्तिसंगीत’ कार्यक्रम, तसेच पद्मश्री विजय घाटे यांचा ‘तालचक्र’ कार्यक्रम झाला. सायंकाळी धूपारतीनंतर मुंबई येथील राजेश कृष्णा खर्डे यांचा ‘परंपरा साईंची’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रात्री १० वाजता शेजारतीने उत्सवाच्या सांगता दिनाची सांगता करण्यात आली.
पुण्यतिथी उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. साईसमाधी मंदीरात दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली.
साईबाबांच्या जीवन चरित्रावरील १२१ चित्रकृती पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून चेन्नई येथील श्री साई ट्रस्टचे संस्थापक के. व्ही. रमणी यांनी साईबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित १२१ चित्रकृती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. या चित्रकृती ८ बाय ५ फूट आकाराच्या असून, कॅनव्हास रोल स्वरूपात आहेत. त्यांना आकर्षक फ्रेम करून संस्थान परिसरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रत्येक चित्रकृतीतील प्रसंगाची माहिती देणारे स्वतंत्र माहिती फलकही तयार केले जाणार आहेत.