Headlines

हलगी-संबळचा निनाद अन् आतषबाजीने उजळला आसमंत:नवनागापुरात विजयादशमीचा सोहळा उत्साहात साजरा, देवी मातेच्या जयघोषाने दुमदुमला परिसर‎




विजयादशमीनिमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्यावतीने २५ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रावण दहनाचा थरार अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी देवस्थानच्या मैदानात मोठी गर्दी केली होती. रावण दहनानंतर करण्यात आलेल्या नेत्रदीपक आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला. उत्साहपूर्ण वातावरणात विजयादशमीचा सोहळा साजरा करण्यात आला. विजयादशमीनिमित्त देवस्थान परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिरात श्री रेणुकामातेची विधिवत आरती करण्यात आली. त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. हलगी आणि संबळच्या निनादाने परिसरात उत्साह संचारला होता. पारंपरिक वाद्यांच्या तालावर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि भाविकांनी ठेका धरत मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या मिरवणुकीतील तालावर नृत्य करणाऱ्या घोड्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. लहान मुलांसह नागरिकांनीही या मिरवणुकीचा आनंद घेतला. मंदिर परिसरातून सुरू झालेल्या या मिरवणुकीमुळे विजयादशमीच्या उत्सवाला अधिकच रंगत आली. मिरवणुकीनंतर मंदिरासमोरील मैदानात उभारण्यात आलेल्या २५ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या हस्ते दहन करण्यात आले. यावेळी श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्‍वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो भाविक उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टच्यावतीने नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रावण दहन होताच उपस्थित भाविकांनी ‘बोलो सियारामचंद्र की जय’चा एकच जयघोष केला. या घोषणांनी संपूर्ण मैदान दुमदुमून गेले. रावण दहनानंतर सुरू झालेल्या भव्य आतषबाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रंगीबेरंगी फटाक्यांच्या रोषणाईने आकाश उजळून निघाले. हजारो भाविकांनी या नेत्रदीपक सोहळ्याचा आनंद घेतला. शिस्तबद्ध नियोजन आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *