![]()
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आवताडे शुगरने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला ऊसदर देऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा गळीत हंगाम दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस गाळप करणे प्रत्येक कारखान्यासाठी जिकिरीचे ठरणार आहे. असे असतानाही आवताडे शुगर इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिक ऊस गाळप करणार तसेच शेतकऱ्यांना चांगला ऊसदर देण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा मानस असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी केले. आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. या साखर कारखान्याच्या पाचव्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या प्रारंभी सकाळी १० वाजता कारखान्याचे इलेक्ट्रिकल मॅनेजर संजय शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनिता शिंदे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा व होमहवन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता नगरसेवक सोमनाथ आवताडे, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके आणि जनरल मॅनेजर सुधीर पाटील यांच्या हस्ते पाचव्या बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर दामाजी कारखान्याचे माजी संचालक भारत निकम, मंगळवेढा पंचायत समितीचे सदस्य विनायक यादव, बाबा कोंडूभैरी, दामाजीनगरचे माजी उपसरपंच सुहास पवार, शिरसू गोडसे, भीमाशंकर येणपे, वर्क्स मॅनेजर धैर्यशील जाधव, चीफ केमिस्ट सुनील पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Source link
यंदा सर्वाधिक गाळपआणि चांगला ऊस दर:बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी संजय अवताडेंचे प्रतिपादन