Headlines

तहसील कार्यालयासमोर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह:मागण्या पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा‎




तालुक्यासह राज्यभरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून सीपीएमचे राज्यव्यापी महामुक्काम सत्याग्रह सुरू झाला. हे आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभा, सिटू, जनवादी महिला संघटना आणि डीवायएफआयने हा एल्गार पुकारला आहे. या आंदोलनात दुष्काळ हाच मुख्य मुद्दा असून यंदा पावसाने ओढ दिल्याने अकोलेसह नगर जिल्ह्यात व राज्यभरातून खरीप पीक हातचे गेले आहे. शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी नुकसानभरपाई द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, पीक विमा योजनेतील सर्व ट्रिगर लागू करून भरपाई द्यावी, तसेच वनजमीन, गायरान, देवस्थान आणि घरांच्या तळजमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, नमो शेतकरी सन्मानचे थकीत दोन हप्ते तातडीने द्यावेत, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत. यासोबतच ८१ लाख लाडक्या बहिणींचा प्रश्नही या आंदोलनातून लावून धरण्यात आला आहे. केवायसी प्रक्रिया बंद असल्याने त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यांना पुन्हा समाविष्ट करून थकीत मानधन द्यावे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेने केली आहे. तर महामुक्काम सत्याग्रहाची व्याप्ती वाढवण्यासाठी गुरुवारी (दि.२२) प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची अकोले येथे जाहीर सभा होणार आहे. माकपच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात, पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जीवा पांडू गावित, आमदार विनोद निकोले आणि डॉ. अजित नवले मार्गदर्शन करणार आहेत. या सभेतून दुष्काळी शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडल्या जाणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबर रोजी २१ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी आपल्या वाहनांसह अकोलेत येऊन अकोले ते मुंबई लाँग मार्च काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत धडक देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *