भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना सरकारी यंत्रणेतील चौकशी प्रक्रियेवर, भ्रष्टाचारविरोधी कारवाईवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. चौकशीच्या नावाखाली दोषींना संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत त्
.
भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकारचे ‘कवचकुंडल’
रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगतानाच मुनगंटीवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीवर मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, “गेल्या दीड वर्षात अँटी करप्शनने (ACB) साडेतीनशे (350) केसेसमध्ये रेड केली आहे. मात्र, या अधिकाऱ्यांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांनी अद्याप परवानगीच दिलेली नाही. अधिकाऱ्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी हे नियम बनवले आहेत का? जनतेच्या घामाच्या पैशातून टॅक्स भरला जातो, त्यावर तुम्ही मस्त पगार घेता आणि जणू काय तुमच्या बापाचं राज्य असल्यासारखं वागता,” अशा संतप्त शब्दांत त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. ‘चौकशीचा अर्थ आजकाल कोणीच दोषी नाही,’ असा झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्रालयातील ‘बत्तीगुल’ संशयास्पद
नुकत्याच मंत्रालयात गेलेल्या लाईटवरून मुनगंटीवार यांनी मोठा संशय व्यक्त केला. “मंत्रालयात अशी लाईट जाणे ही खूप मोठी बाब आहे. एखाद्या संगणकामधील माहिती (डेटा) गायब करायची असेल, तर असे प्रकार होऊ शकतात. आजकाल असे ‘कलाकार’ वाढले आहेत. त्यामुळे याकडे संशयाच्या नजरेने पाहण्याची गरज आहे. लंडनमध्ये 35 वर्षे लाईट गेली नाही, आणि आमच्या मंत्रालयात लाईट जाते, हे कोणत्या शतकात आहोत आपण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘तुडवा अभियान’ म्हणजे कायद्यावर अविश्वास
लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवर बोलताना त्यांनी दोन्ही बाजू तपासण्याची गरज व्यक्त केली. मात्र, याच वेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर (शिंदे गटावर) थेट निशाणा साधला. “शिंदे सेनेने ‘तुडवा अभियान’ घोषित केले. या अभियानाचा अर्थच असा आहे की तुमचा कायद्यावर विश्वास राहिलेला नाही. जिथे सापडेल तिथे तुडवा, हा काय प्रकार आहे?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
ठाणे वनविभाग टीडीआर घोटाळा आणि मंत्रिमंडळ विस्तार
ठाण्यातील २८०० कोटींच्या वनविभागाच्या कथित टीडीआर घोटाळ्यावर बोलताना त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली. “निर्दोष असेल तर त्याला अडकवू नका आणि दोषी असेल तर त्याला सोडू नका,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवर त्यांना विचारले असता, त्यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले. “पाऊस आला पाहिजे, शेतकरी पेरणीची वाट पाहत आहेत. मला मंत्रीपदाबद्दल विचारू नका, हा प्रश्न देवेंद्रजींना विचारा. मी माझी उत्तरपत्रिका लिहितोय, त्याला मार्क देणारे आणि मूल्यांकन करणारे ते आहेत,” अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.
हेही वाचा
पावसाळी अधिवेशनाचा बारावा दिवस:डॉक्टरांचा निष्काळजीपणा, गावांमध्ये स्मशानभूमीच नसल्याचा मुद्द्यावरुन विधानसभेत खडाजंगी

पावसाळी अधिवेशनात आज सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच गंभीर प्रश्नांवरून विधानसभेत मोठी चर्चा पाहायला मिळाली. एकीकडे राज्यातील डॉक्टरांच्या वाढत्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जिवाशी होत असलेल्या खेळाचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे उपस्थित करण्यात आला; तर दुसरीकडे, प्रगत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अंत्यविधीसाठी साधी ‘स्मशानभूमी’ उपलब्ध नसल्याचे विदारक वास्तव सभागृहात मांडण्यात आले. येथे वाचा सविस्तर