Headlines

दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचले पुराचे पाणी:गोदावरी दुथडी भरून वाहिली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा




गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात आता जोरदार कमबॅक केले आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नाशिक शहर जलमय झाले असून, गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला मोठा पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पुराचे पाणी रामकुंड परिसरातील प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या छातीपर्यंत पोहोचले आहे. तसेच, रामसेतू पुलालाही पाण्याचा स्पर्श झाला आहे. गोदामाईचे हे रौद्र रूप आणि हंगामातील पहिला पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी नदीकाठी मोठी गर्दी केली आहे. धरणाचे दरवाजे बंद, तरीही गोदावरीला पूर यंदाच्या या पहिल्या पुराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, गंगापूर धरणातून नदीपात्रात पाण्याचा एक थेंबही विसर्ग करण्यात आलेला नाही. धरणाचे दरवाजे अद्याप बंदच आहेत. मात्र, गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात आणि शहरात सलग सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीत पावसाच्या पाण्याची मोठी आवक झाली. या पावसामुळेच गोदावरीची पाणीपातळी वेगाने वाढली असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. धरणातून पाणी न सोडताही आलेला हा पूर पावसाचा जोर स्पष्ट करणारा आहे. रामकुंडावरील अनेक घाट पाण्याखाली गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रामकुंड परिसरातील बहुतांश घाट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पुराची पातळी मोजण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये आता पूरस्थिती निर्माण झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाचा इशारा: ‘नदीपात्रात गर्दी करू नका’ भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, नाशिक शहर आणि जिल्ह्यात पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या परिस्थितीवर करडी नजर ठेवली आहे. नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी किंवा पूर पाहण्यासाठी नदीपात्रात विनाकारण गर्दी करू नये आणि पुराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, असे कडक आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हेही वाचा.. राज्यात पावसाचा धुमाकूळ: पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यावर हायअलर्ट; मुंबई, नाशकात जोर ओसरला, वाचा तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय? राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. संपूर्ण जून महिन्याची पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघाली आहे. एकीकडे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळून मुंबईला पावसापासून थोडा दिलासा मिळाला असला, तरी पुण्यात मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावर आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *