![]()
राज्यातील जेल प्रशासनाकडून कैद्यांच्या अन्न खरेदीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराचा दावा करते, मग या महाघोटाळ्याकडे सरकारचे लक्ष का नाही? हा घोटाळा करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार का? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मेसर्स एमपी भुतडा (लातूर) या कंपनीला वर्क ऑर्डर मिळाली असून, जेल प्रशासन गृहखात्याच्या अखत्यारित येत असल्याने हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, येरवडा, काळंबा, सांगली आणि सोलापूर येथील तुरुंगांमध्ये कैद्यांना अन्नपुरवठा करण्यासाठी 2024 मध्ये कंत्राट काढण्यात आले होते. या टेंडर प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत देशपांडे म्हणाले, बाजारामध्ये ज्या वस्तू रिटेलमध्ये 135 रुपये किलोने मिळतात, त्यासाठी 209 रुपयांपेक्षा जास्त दराचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा हे टेंडर पास झाले, तेव्हा बाजारात तूरडाळ 97 रुपये किलो होती, परंतु जेल प्रशासनाने ती चक्क 209 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली. प्रशासन अशा प्रकारे दुप्पट किमतीने वस्तू का विकत घेत आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. कैद्यांना न मिळणाऱ्या गोष्टींचे टेंडर संदीप देशपांडे म्हणाले की, ज्या वस्तू जेलमध्ये प्रत्यक्षात दिल्याच जात नाहीत, त्यांचीही टेंडर्स काढली गेली आहेत. तुरुंगात बाजरी आणि ज्वारी कुठेच दिसत नाही, मात्र कागदावर टेंडर सुरू आहे. कैद्यांना बेसन आणि शेंगदाणेही मिळत नाहीत. जेल प्रशासन कंत्राटदाराकडून 10.70 रुपयांना एक अंडे विकत घेते, पण ते सामान्य कैद्यांना मिळतच नाही; जे पैसे मोजतात केवळ त्यांनाच ते दिले जाते. मी जेलमध्ये काही दिवस काढले आहे त्यामुळे मला ही माहिती आहे, तुम्ही संजय राऊत यांनाही याबद्दल विचारू शकता त्यांनीही 6 महिने जेलमध्ये काढल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. राज्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे संदीप देशपांडे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा 12 रुपये भाव देते, मात्र तोच कांदा जेल प्रशासन कंत्राटदारांकडून 40 रुपये किलो दराने खरेदी करत आहे. या संपूर्ण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून राज्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालून कारवाई केली पाहिजे. कल्याणमधील मारहाणीवरून सत्ताधाऱ्यांवर प्रहार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात शिवसेना नगरसेवकाकडून महिला डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचाही देशपांडे यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, सध्या सत्ताधाऱ्यांना सत्तेचा मोठा माज आला आहे, मात्र येत्या काही दिवसांत राज्यातील जनता हा माज नक्कीच उतरवेल, असा इशारा त्यांनी दिला.
Source link
कैद्यांच्या अन्नात शेकडो कोटींचा घोटाळा:शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव, जेलमध्ये मात्र तिप्पट दराने खरेदी, याची चौकशी व्हावी- संदीप देशपांडे