![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत पातळीवर सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. हिंगोलीचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असून, “ज्या मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, त्यांना घरचा रस्ता दाखवा,” अशी थेट मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. नांदेड आणि सोलापूर येथे झालेल्या आढावा बैठकांमध्ये शिवसैनिकांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांविरोधात संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. नांदेड येथे शिवसेना शिंदे गटाच्या तीन जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली, मात्र यावेळी त्यांचे लक्ष्य विरोधक नसून स्वपक्षीय मंत्री होते. संतोष बांगर म्हणाले, “काही मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. हे मंत्री उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाहीत की त्यांची कामे करत नाहीत. अशा अहंकारी मंत्र्यांना वेळीच घरी पाठवा, तरच पक्ष टिकेल.” यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच बांगर यांनी हा ‘घरचा आहेर’ दिल्याने उपस्थित पदाधिकारी अवाक झाले. धाराशिवच्या शिवसैनिकांचा सोलापुरात संताप दुसरीकडे, शिंदेंच्या शिवसेनेने सोलापूर येथे आयोजित धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीतही मोठा राडा पाहायला मिळाला. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांनी अन्यायाचा पाढा वाचला. “नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जाणीवपूर्वक शिवसेनेला भाजपच्या दावणीला बांधले जात आहे,” असा खळबळजनक आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. तुळजापूर, कळंब आणि धाराशिवमध्ये पक्ष संघटनेची गळचेपी होत असून भाजप वरचढ ठरत असल्याची भावना सैनिकांनी व्यक्त केली. श्रीकांत शिंदेंचा पारा चढला; ‘शिस्त’ पाळण्याचे बजावले बैठकीत पदाधिकारी एकमेकांशी भिडल्याचे पाहून खासदार श्रीकांत शिंदे यांचा संयम सुटला. “तुम्हाला बोलायला संधी दिली तर तुम्ही शिस्त सोडून एकमेकांशी मारामारी करता का?” अशा कडक शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. संघटनात्मक कामात सुधारणा करा आणि शिस्त पाळा, अन्यथा कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Source link
काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली, त्यांना घरचा रस्ता दाखवा:शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची खासदार श्रीकांत शिंदेंकडे मागणी