![]()
आषाढी एकादशीनिमित्त बागलाण सायकल फाउंडेशनच्या वतीने ९ ते ११ जुलै या कालावधीत सटाणा ते पंढरपूर पर्यावरणपूरक सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी दिली. यावर्षीच्या सायकल वारीत एकूण ५१ सायकलपटू सहभागी होणार आहे. सुमारे ४१० किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. विठ्ठल नामाचा गजर करत ही वारी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. फाउंडेशनच्या या उपक्रमातून ”झाडे लावा-झाडे जगवा’, पाणी वाचवा, प्लास्टिकला नकार, स्वच्छ वारी-हरित वारी’ यांसारख्या संदेशांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सायकलिंगमुळे आरोग्य सुधारते, प्रदूषण कमी होते आणि इंधनाची बचत होते, हा संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. बागलाण सायकल फाउंडेशनने यापूर्वीही विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रम यशस्वीपणे राबविले असून, या सायकल वारीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा आणखी एक आदर्श उपक्रम हाती घेतला आहे.फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य या वारीच्या नियोजनासाठी सज्ज झाले असून, पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ९ जुलै : सटाणा – चांदवड – लासलगाव – देवगाव – कोपरगाव – शिर्डी – बाभळेश्वर (सुमारे १४० किमी) १० जुलै : बाभळेश्वर – अहिल्यानगर – मिरजगाव – पाटेगाव (सुमारे १४५ किमी) ११ जुलै : पाटेगाव – करमाळा – कुर्डूवाडी – पंढरपूर (सुमारे १२५ किमी) एकूण तीन दिवसांत ४१० किलोमीटरचे अंतर पार करून सायकलपटू पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत.
Source link
बागलाण फाउंडेशनची पंढरपूर सायकल वारी:9 ते 11 जुलैदरम्यान 51 सायकलपटूंचा 410 किमी प्रवास