Headlines

निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार‎




आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक घरातून हरित शहराच्या संकल्पनेला बळ मिळावे, या उद्देशाने प्रयास दादी-नानी ग्रुपने महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘हरित शहर’ अभियानात सहभाग नोंदविला. या उपक्रमात महिला सदस्यांना उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या वतीने विविध देशी वृक्षांची रोपे वितरित करण्यात आली. महिलांनी आपल्या घराच्या अंगणात, परिसरात आणि उपलब्ध जागेत वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली या दोन्हींचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. सेलोत म्हणाल्या, “महिलांनी प्रथम स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी, योगाभ्यासाने आणि प्राणायामाने झाली तर संपूर्ण दिवस उत्साही राहतो. सात्विक, संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. ऋतूनुसार उपलब्ध फळे, भाज्या आणि नैसर्गिक रंगांनी समृद्ध अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा. मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.” या कार्यक्रमास प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्षा राजश्री शितोळे, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड, हभप प्रभाताई भोंग, उपाध्यक्षा सुचेता बोरकर, उज्वला बोगावत, मेघना मुनोत, शामल शिंदे, सुनिता काळे उपस्थित होत्या. रजनी भंडारी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या कमिटीवर निवड झाल्याबद्दल ॲड. रवींद्र शितोळे यांचा प्रयास ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक, बौद्धिक आणि ज्ञानवर्धक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्या महिलांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले, तर राजश्री शितोळे यांनी आभार मानले. नियमित योगाभ्यास निरोगी जीवनाचे गमक प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका मुंदडा वयाच्या साठीनंतरही त्यांनी अत्यंत अवघड योगासने सहजतेने केली. मुंदडा म्हणाल्या, योग हा एका दिवसाचा चमत्कार नसून सातत्यपूर्ण साधना आहे. गेल्या पस्तीस वर्षांपासून मी नियमित योगाभ्यास, योग्य आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या पाळत आहे. त्यामुळेच आजही मी निरोगी आणि ऊर्जावान आहे. प्रत्येक महिलेने दररोज किमान काही मिनिटे योगासाठी द्यावीत. निरोगी शरीर आणि शांत मन हेच आयुष्यातील खरे वैभव असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *