![]()
राज्य सरकार एकीकडे सांगते की स्मार्ट मीटरची सक्ती नाही, मात्र दुसरीकडे शहरात व ग्रामीण भागामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. हा प्रकार तातडीने बंद करा. यापुढे जिल्ह्यात कुठेही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही. वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू आणि जेलमध्येही जाऊ, असा थेट आणि आक्रमक इशारा खासदार निलेश लंके यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे. महावितरण विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभाराचा अक्षरशः पाढाच वाचला. अधिकाऱ्यांकडून होणारी पैशांची मागणी आणि शेवगाव तालुक्यात बांबूवर ओढलेल्या विजेच्या तारा यांसारख्या गंभीर बाबी या मोर्चामध्ये समोर आल्या. अधिकाऱ्यांची अरेरावी आणि ‘रामभरोसे’ कारभार खासदार निलेश लंके यांनी अधीक्षक अभियंता विजयकुमार पवार यांना निवेदन देऊन सुनावले की, “शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्याचे काम महावितरण कार्यालयाने करावे. काही अधिकारी व कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाहीत उलट विचारणा केली तर अरेरावीची भाषा वापरतात. ज्या गावांमध्ये सिंगल फेज योजना नाही, त्या गावांची यादी करून त्यांना तातडीने लाईट द्यावी. ते पुढे म्हणाले, “श्रीगोंदा तालुक्यात व नगर शहरामध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत करावी आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. आम्ही केलेल्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली जाते, आमचे काम वेळेवर होत नाही, असे यापुढे चालणार नाही. तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करा. पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागाने उपाययोजना करणे गरजेचे होते. शेवगाव तालुक्यात अक्षरशः बांबूवर विजेच्या तारा ओढल्या आहेत, तर नगर शहरात बहुतांश भागातील डीपी उघड्या आहेत. महावितरण विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळत असून येत्या पंधरा दिवसात नागरिकांच्या सर्व तक्रारींची सोडवणूक करावी,” अशा कडक सूचना खासदार लंके यांनी दिल्या.शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये महावितरण कार्यालयाकडून अवाजवी व वाढीव लाईट बिल दिले जातात, ते त्वरित कमी करावे. ग्रामीण भागामध्ये सुरू असलेले अघोषित व अनियमित लोडशेडिंग तातडीने बंद करावे. जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत व तातडीने बसवून देण्यात यावेत. अतिवृष्टी व वादळी पावसामुळे नुकसान झालेले लाईटचे पोल, डीपी व तुटलेल्या तारा त्वरित दुरुस्त करून द्याव्यात. शेतकऱ्यांच्या डीपी अभावी होत असलेले पिकांचे नुकसान त्वरित टाळण्यात यावे. आज शेतकऱ्यांना सोलरसाठी वर्ष-दोन वर्षे पैसे भरूनही सोलर मिळत नाही, अशी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. तसेच सोलर एजन्सीकडून शेतकऱ्यांकडे जास्तीच्या पैशांची मागणी केली जाते, अशा लुटारू सोलर एजन्सीवर कडक कारवाई करण्यात यावी.
Source link
आंदोलन:जिल्ह्यात कुठेही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही, वेळ पडल्यास जेलमध्ये जाऊ- खासदार लंके