![]()
यंदाची आषाढी एकादशी जुलै महिन्याच्या अखेरीस येत असल्याने, यात्रेदरम्यान संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरातील नवीन दर्शन मंडपाच्या कामामुळे दरवर
.
पंढरपुरात दरवर्षी आषाढी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी रिद्धी-सिद्धी गणपती दर्शन रांगेत साधारण १० ते १२ पत्राशेड उभारले जातात. परंतु, यंदा नवीन दर्शन मंडपाचे बांधकाम सुरू असल्यामुळे या पारंपरिक जागेतील ६ ते ७ शेड कमी झाले आहेत. या बदललेल्या परिस्थितीमुळे दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या वारकऱ्यांचे ऊन-पावसापासून रक्षण व्हावे, म्हणून समितीने युद्धपातळीवर पर्यायी जागांची निवड केली आहे. भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीने वेगवेगळ्या भागात मिळून २० पत्राशेड आणि एक जर्मन हँगर उभारण्याचे काम सुरू केले आहे. जुनी दर्शन रांग शेडच्या दोन्ही बाजूंना २ नवीन पत्रशेड वाढवण्यात आले आहेत. तर जनक महाराज मठाच्या ३ एकर विस्तीर्ण जागेत ८ पत्रशेड उभारले जात आहेत. ही जागा दोन महिन्यासाठी मंदिर समितीने भाडे देऊन घेतली आहे. याशिवाय गोपाळपूर रोड येथील एका खाजगी जागेत ४ पत्रशेडची व्यवस्था केली आहे. तसेच गोपाळपूरच्या पुढे पाटील यांच्या खाजगी ३ एकर जागेत एक मोठा वॉटरप्रूफ ‘जर्मन हँगर’उभारण्यात येत आहे. गोपाळपूर पंढरपूर रोडवर आसरा हॉटेलच्या अलीकडे असलेल्या खाजगी जागेत ६ पत्रशेड उभारण्याचे काम सुरू आहे. यंदा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आषाढी यात्रा असल्याने पंढरपुरात जोरदार पावसाची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन सर्व पत्रशेड आणि जर्मन हँगर मजबूत व वॉटरप्रूफ पद्धतीचे बनवण्यावर भर दिला जात आहे. दर्शन रांगेत पाणी साचणार नाही आणि चिखलामुळे वारकऱ्यांना त्रास होणार नाही, यादृष्टीने मंदिर समितीचे प्रशासन व बांधकाम विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. या नवीन नियोजनामुळे यंदाच्या आषाढी यात्रेत भाविकांना रांगेत उभे राहताना मोठा दिलासा मिळणार आहे.
अशी असेल नवीन शेडची व्यवस्था