.

सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरामुळे सिना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला असून पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या जॉईंटला भेगा पडल्या असून आतले गज उघडे पडल्याने पूल कमकुवत झाला आहे. तरीही गेल्या ९ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून अपघात होण्याआधीच पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराकडे जाणारा हा एकमेव मार्ग आहे. माढा तालुक्यातील हजारो भाविक रोज याच पुलावरून ये-जा करतात. तसेच केवड परिसरात ऊस कारखाना असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ मोठी आहे. गेल्या वर्षीच्या महापुरात पुलावरील डांबर पूर्णपणे वाहून गेले. रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून त्यामुळे पुलाचे गज उघडे पडले आहेत. भराव वाहून गेल्याने पूल आणखी धोकादायक झाला आहे. उंदरगाव बस स्थानक ते जामगाव हद्दीपर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. पुलावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. अचानक खड्डा आल्याने मोटारसायकलवरून महिला पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. या मार्गावरून जवळपास ३०० विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. ^मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. सिना नदीवरील पुलाबाबत माझ्याकडे सध्या माहिती उपलब्ध नाही. प्रत्यक्ष पाहणी करून पुढील निर्णय घेऊ. भिमाशंकर मेकटरी, उप अभियंता सा.बां.वि ^उंदरगाव ते जामगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या मार्गावर विद्यार्थी, भाविकांसह नागरिकांची वर्दळ असते.अचानक खड्डा आल्याने मोटारसायकलवरून महिला पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अपघातांचे प्रमाण वाढले असून अद्याप जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनाने तिची वाट पाहू नये. हा संपूर्ण रस्ता तातडीने दुरुस्त करावा. गणेश चव्हाण, जिल्हा सचिव – मराठा महासंघ
पुलावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान
जिवीतहानीची वाट पाहू नका