Headlines

मी दोषी ठरलो तर सिद्धिविनायक मंदिरासमोरच फासावर द्या:एकनाथ शिंदेंच्या आरोपांना आदेश बांदेकरांचे प्रत्युत्तर




अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ‘सिद्धिविनायक मंदिर दानपेटी चोरी’चा मुद्दा उपस्थित केला. या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते आदेश बांदेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “माझ्या नावाचे एक जरी चुकीचे व्हाउचर आढळले किंवा मी दोषी ठरलो, तर मला मंदिरासमोरच फासावर लटकवा,” असे थेट आणि खुले आव्हान बांदेकर यांनी राज्य सरकारला दिले आहे. विधानसभेत नेमका काय राडा झाला? पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राम मंदिर देणगीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी ‘देणगी चोर’ असा उल्लेख करत भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. याला सडेतोड उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले, “ज्यांच्या काळात सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटली गेली, त्यांचे हिंदुत्व कोणते? आघाडीचे सरकार असताना ट्रस्टवर कोण होते हे सर्वांना माहीत आहे. सिद्धिविनायकला धोके आणि यांना खोके अशी यांची प्रवृत्ती आहे.” नाव न घेता शिंदेंचा हा थेट रोख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे होता. “दोषी आढळलो, तर मंदिरासमोरच फासावर द्या!” शिंदेंनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर सध्या आषाढी वारीमध्ये असलेल्या आदेश बांदेकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, “माझा कार्यकाळ संपून आता तीन वर्षे उलटून गेली आहेत. सध्या मंदिराचा कारभार विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या हातात आहे. सिद्धिविनायक मंदिराचे कार्यकारी आणि वित्त अधिकारी हे थेट मंत्रालयातून नियुक्त केले जातात. त्यामुळे जर काही गैरव्यवहार झाला असेल, तर सरकारने तो जाहीर करून दाखवावा.” हवेत आरोप करण्यापेक्षा चौकशी करा, अशी मागणी करत बांदेकर पुढे म्हणाले, “गेल्या साडेतीन वर्षांत कोण अध्यक्ष होते हे सर्वांना माहीत आहे. जर खरंच काही गैरव्यवहार झाला असेल तर त्याची खुशाल चौकशी करा. या चौकशीत मी स्वतः जरी दोषी ठरलो, तरी मला त्याच मंदिरासमोर फासावर द्या. पण पुराव्याविना खोटे आरोप करणे थांबवा.” “माझ्यासोबत भाजपचेही विश्वस्त होते” आपल्या कारभाराच्या पारदर्शकतेवर भर देताना बांदेकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळातील पहिली तीन वर्षे भारतीय जनता पक्षाचे सदस्यही त्यांच्यासोबत विश्वस्त म्हणून कार्यरत होते. “त्या काळातील प्रत्येक बैठकीची कागदपत्रे आणि निर्णय मंत्रालयात उपलब्ध आहेत. त्यात कुणी फेरफार केला असेल तर मला माहीत नाही. पण माझ्या नावाचे एक जरी चुकीचे व्हाउचर आढळले, तर खुशाल कारवाई करा,” असे बांदेकर म्हणाले. ‘स्वतःचे गैरव्यवहार लपवण्यासाठी दिशाभूल नको’ विरोधकांना टोला लगावताना बांदेकर म्हणाले की, “उगाच धूर दिसला म्हणून आग लागली असे समजू नका. आजही मी गणपती बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकतो की, आम्ही अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला आहे. स्वतःचे गैरव्यवहार लपवण्यासाठी इतरांवर आरोप करून लोकांची दिशाभूल करू नका.” बांदेकरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता सिद्धिविनायक दानपेटीचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी “भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक मोठे राजकीय दावे केले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *