![]()
राज्याच्या राजकारणात सध्या भविष्यातील मुख्यमंत्री आणि नेतृत्वावरून जोरदार दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यातच आता शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठी राजकीय अपेक्षा व्यक्त केली आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे,” असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या राजकीय भाकितांची खिल्ली उडवत कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आक्रमक भूमिका घेतली. बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना थेट जन्मठेप देण्याची मागणी त्यांनी केली आहे. “भाजपने शिंदेंप्रती कृतज्ञता बाळगावी” राज्याच्या भविष्यातील राजकारणाबाबत बोलताना बच्चू कडू यांनी स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातच राहावे आणि देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावे. म्हणजेच, देशात फडणवीस आणि महाराष्ट्रात शिंदे, असा प्रवास आता सुरू झाला पाहिजे आणि मला वाटते येत्या काही महिन्यांतच हा बदल पाहायला मिळेल.” पुढे भाजपला सल्ला देताना ते म्हणाले, “ज्या एकनाथ शिंदे यांच्या धाडसामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, त्या अर्थाने भाजपने शिंदेंबद्दल उपकाराची आणि कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे.” “संजय राऊतांची भविष्यवाणी कधीच खरी ठरत नाही” खासदार संजय राऊत यांनी राज्यातील नेतृत्वाबाबत मोठी भविष्यवाणी केली होती. यावर पत्रकारांनी विचारले असता, बच्चू कडू यांनी राऊतांना थेट टोला लगावला. “संजय राऊत हे काहीही बोलत असतात. त्यांची भविष्यवाणी आजवर कधीच खरी ठरलेली नाही,” असा खोचक टोला कडू यांनी लगावला. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना थेट जन्मठेप द्या राजकारणासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही बच्चू कडू यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. बोगस बियाणे आणि खतांच्या सुळसुटावर संताप व्यक्त करत ते म्हणाले, “बोगस बियाणे आणि बोगस खते विकून जो घोटाळा केला जातो, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मोठ्या अडचणीत येतो. त्याचे पूर्ण पीक आणि वर्ष वाया जाते. त्यामुळे अशा बोगस कंपन्या चालवणाऱ्या लोकांना थेट जन्मठेपेची शिक्षाच झाली पाहिजे.” संजय राऊत नेमके काय म्हणाले होते? खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा दावा केला होता. राऊत म्हणाले होते की, “२०२९ नंतर देशात मोदी सरकार राहणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच केंद्रात जातील आणि त्यानंतर महाराष्ट्रात भाजपची सर्व सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती येतील. तसेच, एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीही राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत.” हेही वाचा.. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी “भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक मोठे राजकीय दावे केले आहेत. सविस्तर वाचा..
Source link
फडणवीस केंद्रात, शिंदे महाराष्ट्राच्या नेतृत्वात?:बच्चू कडूंचा सत्ताबदलाचा दावा; संजय राऊतांनाही लगावला टोला