![]()
महाराष्ट्र विधान परिषदेतील 5 सदस्यांची 6 वर्षांची मुदत लवकरच संपुष्टात येत असल्याने, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांना सभागृहाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. या पाचही सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपत आहे. राज्य विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 रोजी नागपूर येथे होणार असल्याने, त्यांना या पावसाळी अधिवेशनातच निरोप देण्यात आला. निवृत्त होणाऱ्यांमध्ये बहुतांश सदस्य विरोधी पक्षांचे असल्याने वरिष्ठ सभागृहात विरोधकांचे संख्याबळ कमी होऊन त्यांचा आवाज काहीसा क्षीण होणार आहे. पावसाळी अधिवेशनात निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सतीश चव्हाण व अरुण लाड (राष्ट्रवादी), अभिजित वंजारी व जयंत आसगावकर (काँग्रेस) आणि किरण सरनाईक (शिवसेना) यांचा समावेश आहे. ‘विधान परिषद हे अनुभवी व्यक्तींना सामावून घेणारे प्रभावी व्यासपीठ’ विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी निरोप समारंभात बोलताना वरिष्ठ सभागृहाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “देशातील केवळ सहा राज्यांत विधान परिषद अस्तित्वात असून महाराष्ट्राला ही वैभवशाली परंपरा लाभली आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तींना लोकशाही व प्रशासकीय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे सभागृह करत आहे.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कार्याचा गौरव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “जनतेच्या हितासाठी या सदस्यांनी केलेले काम आणि सभागृहाची परंपरा जपण्याची त्यांची भूमिका कायम स्मरणात राहील,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच या सदस्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. निवृत्त होणाऱ्या सदस्यांचे सभागृहातील योगदान निरोप समारंभाच्या शेवटी, निवृत्त होणाऱ्या या पाचही सदस्यांनी सभागृहातील आपल्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, सभागृहातील अन्य सदस्यांनीही त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Source link
विधान परिषदेचे 5 सदस्य निवृत्त:हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी बाकांवरील अनुभवी चेहरे बाहेर; पावसाळी अधिवेशनात सभागृहाकडून भावपूर्ण निरोप