Headlines

अपघातांची संख्या वाढली:लाडसावंगी ते करमाड रस्त्याची दुरवस्था‎, प्रशासनाने लक्ष देण्याची होतेय मागणी




लाडसावंगी ते करमाड रस्ता सध्या पूर्णपणे उखडला असून, या रस्त्यावरील जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे पाच दिवसांपूर्वी दूधडजवळ दीपक सोमनाथ काळे या तरुण प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, निष्पाप नागरिकांचा बळी घेणारे प्रशासन अजून किती नागरिकांचे जीव घेणार? असा सवाल वाहनधारकांकडून विचारला जात आहे. हा रस्ता केवळ स्थानिक वाहतुकीसाठीच नाही, तर औद्योगिक आणि प्रादेशिक दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. लाडसावंगी, हतमाळी, अंजनडोह, सेलूद, चारठा, भाकरवाडी, सिरसगाव, घाटी, रामवाडी, भोगलवाडी, मुरूमखेडा, पिंपळखुटा, दूधड, भाबरडा, लामकाना, सय्यदपूर, औरंगपूर, ढासला, कासनापूर, दरेगाव यांसह परिसरातील ३० ते ४० गावांतील शेकडो तरुण व कामगार दररोज याच मार्गाने शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी कंपन्यांमध्ये कामासाठी प्रवास करतात. लाडसावंगी जिल्हा परिषद गटासह शेजारील जालना जिल्ह्यातील कामगारांसाठीही एमआयडीसीत पोहोचण्याचा हाच प्रमुख मार्ग आहे. याशिवाय, सिल्लोड आणि भोकरदनहून समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ याच रस्त्यावरून असते. मात्र, सध्या या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. लाडसावंगी आणि पिंपळखुटा फाट्याजवळ रस्ता खड्डेमय झाला असून मोठी कसरत करावी लागत आहे. दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा पुढे दूधड आणि भाबरडा परिसरात तर रस्त्यावर तब्बल एक-एक फुटाचे खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खोलीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे लहान-मोठे अपघात हे रोजचेच झाले आहेत. दीपक काळे या तरुणाचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार आणि नागरिकांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *