Headlines

प्रशासनाला अल्टिमेटम:रेल्वे प्रकल्प रद्द केल्यास आमरण उपोषण करणार, संगमनेरात देवगाव रेल्वे कृती समिती आक्रमक‎




केंद्र व राज्य सरकारने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प स्थगित केल्याच्या निषेधार्थ देवगाव ग्रामस्थांच्या वतीने संगमनेर बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय लाक्षणिक उपोषण शनिवारी उत्स्फूर्त वातावरणात पार पडले. या आंदोलनाला देवगावसह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, युवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. रेल्वे प्रकल्प पूर्ववत सुरू व्हावा यासाठी आता हे आंदोलन केवळ एका गावापुरते मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यात पसरणार आहे.तालुक्यातील इतर गावांनीही देवगावच्या धर्तीवर साखळी पद्धतीने आंदोलन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या आंदोलनाचा पुढील टप्पा गटनिहाय असेल आणि पुढचे आंदोलन हे चंदनापुरी गटाच्या वतीने घेण्याचे निश्चित झाले आहे.यानंतर संपूर्ण संगमनेर तालुक्याच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल. तरीही शासनाने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास थेट आमरण उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. लाक्षणिक उपोषणाची सांगता झाल्यानंतर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेला पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प तातडीने पूर्ववत सुरू करावा, या मागणीचे सविस्तर निवेदन संगमनेरच्या तहसीलदारांना देण्यात आले. शासनाने ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समितीचे रवींद्र लामखडे, शंकर पावसे, सागर कोल्हाळ, मधुसूदन शिंदे, कोमल म्हस्के, शिबा गायकवाड, उपसरपंच सुनील शिंदे, दिनेश बांगर, संजय देशमुख, प्रमोद शिंदे, प्रकाश कोटकर, तुषार पानसरे, अमोल देशमुख, संतोष शिंदे, राहुल लामखडे, ज्योती लामखडे, किरण देशमुख, गणपत लामखडे आणि अविनाश देशमुख यांनी या आंदोलनाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. नेते आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा उपोषणस्थळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहर प्रमुख अमर कतारी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता ढगे, संगमनेर वकील संघ, राष्ट्रसेवा दलाचे राजाभाऊ अवसक, छात्र भारतीचे अनिकेत घुले तसेच विविध सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *