![]()
ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य बदलण्यासाठी शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना मात्र प्रशासन आणि कंत्राटदारांच्या मनमानी व ढिसाळ कारभारामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका खासगी कंपनीने हा रस्ता बांधला आहे. परंतु त्यासाठीचे साहित्य अत्यंत बोगस आणि निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे लाडकी, पिंपळखुटा लहान, बोडना या गावातील नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्या या रस्त्यावर माती आणि मुरुमाचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकी व चारचाकी वाहने उलटून मोठा अपघात होण्याची भीती बळावली आहे. बांधकाम करताना सदर कंपनीच्यावतीने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे असे झाले, असा नागरिकांनी आरोप आहे. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरुन लाडकी, पिंपळखुटा लहान आणि बोडना या तिन्ही गावांतील शेकडो नागरिक दररोज ये-जा करतात. मात्र रस्त्यावरील घसरणीमुळे आणि मुरुमाच्या खड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहने चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेक दुचाकीस्वार येथे घसरुन छोटे-मोठे अपघात घडले असून काहींना गंभीर दुखापतही झाली आहे. पादचाऱ्यांनाही या रस्त्यावरुन चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी शाळकरी विद्यार्थी, वृद्ध महिला-पुरुष व आजारी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा कंत्राटदार व कंपनीच्या या ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या कामाची त्वरित चौकशी करावी आणि संबंधित कंपनीला नोटीस बजावून रस्ता पुन्हा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एवढेच नव्हे तर प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील संतप्त नागरिकांनी दिला आहे.
Source link
लाडकी-पिंपळखुटा- बोडना रस्त्यावर चिखल:नागरिक संकटात, शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष