Headlines

चौघे ताब्यात:चॅटिंगच्या वादात तरुणाचा भोसकून खून, नातेवाइकांचा 10 तास ठिय्या, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरची घटना




सोशल मीडियावरील चॅटिंगच्या वादातून अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील तरुणाचा ७-८ जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकले, तसेच डोक्यात विटा, काठ्या मारून खून केला. ज्ञानेश्वर व्यंकटी वाकडे (रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घाटनांदूर येथील रेल्वे गेटजवळ घडली. आरोपींना अटक करून त्यांना आश्रय देणाऱ्यांनाही सहआरोपी करावे, या मागणीसाठी १० तास मृताच्या नातेवाइकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मृत ज्ञानेश्वर वाकडे आणि त्याचे मित्र विवेक माणिक तारसे व प्रथमेश जोगदंड हे शनिवारी अंबाजोगाईला गेले होते. परत येताना वाटेत त्यांना सोमनाथ उर्फ श्रीहरी मिसाळ, विशाल शिंदे व सोमनाथ कांबळे भेटले. यावेळी सोमनाथने प्रथमेशला गाठून “सोशल मीडियावर काय चालू आहे? तुला माहीत नाही का, तू सूरज ताटेचा भाऊ आहेस, तुला काही करता येत नाही,” असे चिडवण्यास सुरुवात केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. यानंतर सोमनाथ कांबळे याने फोन करून “चहा पिऊ आणि भांडण मिटवून घेऊ,” असे म्हणत ज्ञानेश्वर व त्याच्या मित्रांना घाटनांदूर येथील रेल्वे गेटजवळ बोलावून घेतले. ज्ञानेश्वर आणि त्याचे मित्र पोहोचताच दबा धरून बसलेल्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच ज्ञानेश्वरचे वडील उत्तरेश्वर वाकडे आणि चुलत भाऊ यांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकाजवळ ज्ञानेश्वर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. पोलिसांनी तातडीने त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मंगल कार्यालयात लपले या हत्येनंतर सर्व आरोपी हे जवळील आई मंगल कार्यालयात लपून बसले होते, जिथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण कटामध्ये मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक बालाजी विलास मिसाळ आणि मालक महेश गारठे यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. भोसकून वीट मारली संशयित सोमनाथ कांबळे याने थेट चाकू काढून ज्ञानेश्वरच्या पोटात खुपसला. ज्ञानेश्वर खाली कोसळल्यानंतर विशाल शिंदे याने त्याच्या डोक्यात वीट मारली, तर गोकूळ इचके याने पाठीत काठीने प्रहार केला. सूरज ताटे, समाधान मिसाळ, कन्हैया उर्फ श्रीहरी मिसाळ व गणेश खंदारे यांनी लाथाबुक्क्यांनी, काठ्यांनी मारहाण केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *