Headlines

मुकुंदवाडीत झाड वाचवण्यास गेलेल्या दुकानदाराचा जेसीबीच्या घावाने मृत्यू:छत्रपती संभाजीनगर मनपा म्हणते तो जेसीबी अन् चालक आमचा नाही




शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामात कंत्राटदार आणि चालकाच्या निष्काळजीपणाचा रविवारी (12 जुलै) बळी गेला आहे. रस्त्याच्या खोदाईत झाड तुटत असल्याचे सांगण्यासाठी गेलेल्या 55 वर्षांच्या किराणा दुकानदाराला जेसीबीच्या फावड्याचा जोरदार फटका बसला. अतिरक्तस्राव झाल्याने यात त्यांचा मृत्यू झाला. मुकुंदवाडीतील स्वराजनगरात घटना घडली. संजय पंढरीनाथ चौधरी (55, रा. स्वराजनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा मुलगा दत्ता चौधरी याच्या फिर्यादीवरून जेसीबी (क्र. एमएच 20 सीएच 7642) चालक अनिल लक्ष्मण राठोड (46, रा. कामगार गल्ली, चिकलठाणा) याच्यावर मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली. मशीनच्या आवाजाने जीव गेला संजय चौधरी यांच्या दुकानासमोर रस्त्याचे काम सुरू होते. खोदाई सुरू असताना बाजूला असलेले एक झाड तुटत असल्याचे सांगण्यासाठी ते जेसीबी चालकाकडे गेले. मात्र, मशीनच्या आवाजामुळे चालकाला त्यांचा आवाज ऐकू आला नाही. याच वेळी चालकाने जेसीबी वळवल्याने त्याचे फावडे चौधरी यांना आदळले. यात गंभीर जखमी झालेल्या चौधरींना खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यामागे परिवार आहे. जेसीबी महापालिकेची नाही संबंधित जेसीबी महापालिकेची नव्हती आणि तिचा चालकही महापालिकेचा कर्मचारी नाही. ती संबंधित कंत्राटदाराची खासगी जेसीबी असू शकते. – अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, महानगरपालिका. चालकाचा बनाव; खाक्या दाखवताच खरे बोलला अपघात घडल्यानंतर गुन्हा दाखल होताना जेसीबी चालकाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने सुरुवातीला स्वतःचे नाव ‘सचिन’ व वय ‘26 वर्षे’ सांगितले. मात्र, त्याचे वय अधिक असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने आपले खरे नाव अनिल राठोड (46) असल्याचे कबूल केले. स्थानिक नागरिकांनुसार, या भागातील रस्त्याचे काम 5 वर्षांपासून रखडलेले होते. आता कामाला सुरुवात झाली, मात्र सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत. यावरून नागरिक व कंत्राटदार यांच्यात सतत खटके उडत होते. काम सुरू असताना मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी तिथे एका सुपरवायझरची उपस्थिती आवश्यक होती. तिथे एखादी व्यक्ती असती, तर चौधरी यांचा जीव वाचला असता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *