![]()
हिंगोलीतून पहिल्याच वर्षी सायकलवारीची सुरवात, सर्वांना लांबपल्याचा सायकल चालविण्याचा अनुभव असलातरी मनात काहीशी धाकधुक होती, मात्र माऊलींचे नामस्मरण करून निघालेली सायकल रॅली पंढरपूरात पोहोल्यानंतर माऊलींच्या पायावर मस्तक ठेवले अन अवघा शीण निघून गेला. त्यातच सायकल रिंगण डोळ्याचे पारणे फेडणारे ठरल्याचे सायकलवारीचे हिंगोली प्रमुख प्रविण काळबांडे यांनी अनुभव कथन केले. मागील पाच वर्षापासून राज्यभरातून सायकलस्वार पंढरपूर येथे आषाढी वारी करतात. त्यानुसार यावर्षी हिंगोलीतूनही सायकल वारी करण्याचा निर्णय झाला. सर्वानी आवश्यक तयारी पूर्ण केली अन ता. 9 जुलै रोजी हिंगोलीतून सायकल वारी सुरु झाली. आपण स्वतः तसेच सोबत रमेश सानप, डॉ. गजानन शिंदे, शिवचरण ठाकूर, राजेश पांडे, गजानन घुगे, विठ्ठल जाधव, मारुती बोबडे, विवेक वाकडे, अविनाथ बोथीकर, श्रीरंग कऱ्हाळे आदींनी यावर्षी सहभाग नोंदविला. हिंगोली येथून निघालेली सायकल रॅली औंढा नागनाथ, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ येरमाळा, बार्शी मार्गे ता. 11 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचली. पहिलेच वर्ष असल्यामुळे सायकलाचा तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर काहीसे थकल्या सारखे जाणवले असे वाटले होते. वारीतील बहुतांश सायकल वारकरी वयाची पन्नाशी उलटलेले होते. त्यामुळे थकवा जाणवणारच होता. मात्र हरिनामाचा गजर करीत, तसेच माऊलींचे नामस्मरण करीत निघालेली सायकलवारी पंढरपूरात पोहोचल्यानंतर माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण शिण निघून गेला. त्यानंतर रविवारी ता. 12 सायकल रिंगण सोहळा पार पडला. या सोहळ्यात चार हजार सायकलवारकरी सहभागी झाले होते. अभूतपूर्व सोहळ्याचा अनुभव घेत हिंगोलीचे सर्व सायकलस्वार परतीच्या मार्गाला लागले. पहिल्या वर्षी सायकल वारीचा आनंद घेतलेल्या वाकऱ्यांनी आता वारी चुकवायची नाही असा निर्धार केल्याचे काळबांडे यांनी सांगितले.
Source link
हिंगोलीकरांची पहिलीच सायकलवारी यशस्वी:माऊलींच्या पायावर मस्तक अन् अवघा शीण गेला निघून