Headlines

70 वर्षीय चालकाचे नियंत्रण सुटले; ट्रकने 3 महिला वारकऱ्यांना चिरडले:ओव्हरटेकच्या नादात सासवड-जेजुरी मार्गावर अपघात




पंढरीकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दिंडीवर दुसऱ्या दिंडीतील एका ७० वर्षीय आजारी चालकाने ओव्हरटेकच्या नादात ट्रक घातला. यात सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच अंत झाला. तर चौघी जखमी झाल्या. काळाने क्रूर घाला घातला. पुण्याजवळील सासवड-जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे आषाढी पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली आहे. नंदा पवार (६०, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली), माधवी राजाराम सलगरे (५५, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली), राजश्री शंकर भोसले (५५, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जेजुरी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचाराचे निर्देश त्यांनी दिले. बोरावके मळा येथून १२ किलोमीटर अंतरावरील बेलसर टोल नाक्याजवळ (हॉटेल शिवदीप लॉजिंगसमोर) दिंडी आली असता ही घटना घडली. प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्याची डावी बाजू पायी चालणाऱ्यांसाठी आणि उजवी बाजू वाहनांसाठी राखीव ठेवली होती. मात्र, लोहा (जि. नांदेड) येथील दिंडीचा ट्रक उजव्या बाजूने जेजुरीकडे जात असताना चालकाने पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी अचानक डावीकडे वळवला. वारीतील प्रत्येक वाहनाची आरटीओकडून योग्यता पाहणी आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीच्या वाहनाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष पास आणि योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. तसेच, चालकाची प्रकृती उत्तम असणेही बंधनकारक असते. या ट्रकला विशेष पास, प्रमाणपत्र मिळाले. पण चालकाच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केला गेला, असे दिसते. मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत… उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. अपघाती मृत्यू, जखमी वारकऱ्यांना ४ लाखांपर्यंत मदत : जीआर जारी वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२६’’चा जीआर जारी झाला. यात ७ ते २५ जुलै २०२६ या वारी कालावधीत अपघात किंवा दुर्घटनेत मृत अथवा जखमी वारकऱ्यांना ४ लाखांपर्यंत मदत दिली जाईल. पंढरपूरला पायी अथवा खाजगी आणि सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४,०००, ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास २.५० लाख, एक आठवड्यापेक्षा अधिक काळ इस्पितळात दाखल असल्यास १६,०००, एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी इस्पितळात दाखल असल्यास ५,४०० रुपये मदत मिळेल. वारकरी आषाढी वारी २०२६ करिता पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदारांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. ट्रकचालकाने घेतले होते सर्दी-तापेसाठीचे औषध अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक ७० वर्षांचा वृद्ध आहे. त्याला सर्दी आणि ताप असल्याने त्याने औषधे घेतली होती. औषधांच्या गुंगीमुळे त्याला डुलकी लागल्याची शक्यता आहे. आजारी आणि वृद्ध चालकाकडे गर्दीत स्टेअरिंग देण्याच्या निष्काळजीपणामुळेच या निष्पाप महिलांना जीव गमवावा लागला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *